९ महिन्याच्या चिमुकलीला पोटाशी घट्ट बांधून आईचा गळफास; हृदयद्रावक घटनेनं गाव हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 09:29 AM2022-03-14T09:29:46+5:302022-03-14T09:37:35+5:30
घटनेचे गांभीर्य ओळखून सोनल आणि तिची मुलगी हर्षदा यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
धुळे तालुक्यातील वणी बुद्रुक येथे सुधाकर माळी हा शेती करताे. साधारण दीड, पावणेदोन वर्षांपूर्वी सोनलसोबत त्याचा विवाह झाला होता. गावात त्यांचे दुमजली घर आहे. काही दिवसांपूर्वी तो परिवारापासून विभक्त झाला होता. या मोठ्या घरात सुधाकर व त्याची पत्नी सोनल राहत होते, तर त्यांचे आई-वडील हे गावातच दुसऱ्या ठिकाणी राहतात. त्यांच्यात कौटुंबिक कलह होता की नव्हता, हे आजही गुलदस्त्यातच आहे.
दुपारची घटना
शनिवारी दुपारी साधारण ४ वाजण्याच्या सुमारास सोनल आणि मुलगी हर्षदा या दोघी एकट्याच होत्या. तिने झोळीचा दोर काढून तो घराच्या लोखंडी कडीला बांधून गळफास लावून घेतला. एवढेच नव्हे, तर आपल्या पश्चात आपल्या मुलीचे काय होईल, बहुधा या विवंचनेतून तिने आपल्या ९ महिन्यांच्या चिमुकलीच्या पोटाला दोर बांधून फास लावून दिला. तिच्या गळ्याला आणि मुलीच्या पोटाला फास लागल्याने दोघांची जीवनयात्रा संपली. सुधाकर माळी हे घरी आल्यानंतर, त्यांनी सोनल आणि त्यांची मुलगी हर्षदा यांना लटकलेल्या अवस्थेत पाहिल्याने ओरड झाली. भरदुपारी आवाज येत असल्याने गावकरी जमा झाले.
रुग्णालयात दाखल
घटनेचे गांभीर्य ओळखून सोनल आणि तिची मुलगी हर्षदा यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलीस पाटील बाबुलाल पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून, तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलीस बंदोबस्तात अंत्ययात्रा
गावात तणावाचे वातावरण असल्याचे कळताच, धुळे तालुका पोलिसांचे पथक दाखल झाले. मृत झालेल्या सोनल आणि हर्षदा यांची रविवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात अंत्ययात्रा काढण्यात आली.
तिघांना अटक
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, सोनलचा पती सुधाकर, सासरा ग्यानिराम गंगाराम माळी आणि सासू जण्याबाई ग्यानिराम माळी या तिघांना तालुका पोलिसांनी संशयावरून चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.