गायीबद्दल तक्रार दिल्याने महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 06:11 AM2018-11-04T06:11:34+5:302018-11-04T06:11:45+5:30

सार्वजनिक ठिकाणी मंदिरासमोर गायीला बांधून उदरनिर्वाह करीत असलेल्या महिलेबाबत एका प्राणिप्रेमीने पोलिसात तक्रार दिली. यामुळे उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करीत या महिलेने औषधांच्या अतिरिक्त गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सकाळी घाटकोपर परिसरात घडली.

The woman's suicide attempt | गायीबद्दल तक्रार दिल्याने महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

गायीबद्दल तक्रार दिल्याने महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई - सार्वजनिक ठिकाणी मंदिरासमोर गायीला बांधून उदरनिर्वाह करीत असलेल्या महिलेबाबत एका प्राणिप्रेमीने पोलिसात तक्रार दिली. यामुळे उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करीत या महिलेने औषधांच्या अतिरिक्त गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सकाळी घाटकोपर परिसरात घडली. सीमा अनिल चव्हाण (३०, रा. पंतनगर) असे या महिलेचे नाव असून तिच्याविरुद्ध राखी कोठारी यांनी तक्रार दिली होती. चव्हाण यांनी कोठारी यांच्याच घरासमोर पित्तशामक गोळ्यांचे अतिरिक्त सेवन केले. चव्हाण यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सीमा चव्हाण यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण या टिळक रोड परिसरातील बालाजी मंदिरच्या रस्त्यावर गाय बांधतात. गायीला भाविकांकडून दिला जाणारा चारा विकून त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. हे निदर्शनास येताच याच परिसरातील एका स्वयंसेवी संस्थेत कार्यरत राखी कोठारी यांनी चव्हाण यांच्याविरोधात देवनार पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकारी डॉ. शिवाली गंगावणे यांच्याकडे तसेच पोलीस ठाण्यातही तक्रार दिली होती. त्यामुळे चव्हाण यांच्यावर उपासमारीची वेळ आली.
गेल्या पंधरा दिवसांपासून त्या परिसरातील लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांकडे मदतीसाठी प्रयत्न करीत होत्या. मात्र कोणाकडूनही सहकार्य मिळत नसल्याने त्यांनी अखेर कोठारी यांनाच विनंती केली. त्या वेळी गायीच्या आरोग्याची होणारी हेळसांड थांबविणे हाच हेतू असल्याचे कोठारी यांनी सांगितले. त्यामुळे हताश चव्हाण यांनी शनिवारी कोठारी यांच्या घरासमोर जाऊन गोळ्यांचे सेवन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या बेशुद्ध पडल्यानंतर तेथील रिक्षा चालकाने त्यांना रुग्णालयात दाखल केले.
पंतनगरच्या वरिष्ठ निरीक्षक रोहिणी काळे म्हणाल्या, ‘सार्वजनिक रस्त्यावर कचरा करणे चुकीचे आहे, कोणी भाविक तेथे गेल्यावर त्याच्याकडून पैसे घेऊन चारा देणे हा क्रूरपणा आहे. आम्ही यासंदर्भातील तक्रारीची चौकशी करीत आहोत.

तक्रारीनुसार कारवाई

देवनार कत्तलखान्यातील वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाली गंगावणे यांनी सांगितले की, ‘आमच्याकडे संपूर्ण मुंबईतून तक्रारी येतात. कोणी व्हिडीओ, फोटो आणि मेसेज पाठवतात. त्यानुसार आम्ही जनावरे ताब्यात घेऊन कारवाई करतो. तक्रार कोणीही केली तरी त्याबाबत योग्य ते पाऊल उचलण्याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे कारवाई होतेच.

Web Title: The woman's suicide attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.