पतीला खांद्यावर बसवून गावकऱ्यांनी काढली महिलेची धिंड; अफेअरच्या संशयातून तालिबानी शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 01:11 PM2020-07-30T13:11:21+5:302020-07-30T13:17:57+5:30
सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या घटनेबाबत पडताळणी केली असता ही पहिलीच घटना आहे असंही नाही यापूर्वीही या जिल्ह्यात अशा घटना घडल्या आहेत.
झाबुआ – मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल भागात प्रेम प्रकरणातून एका महिलेला तालिबानी शिक्षा दिल्याची घटना सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका महिलेला तिच्या पतीला खांद्यावर घेऊन गावात फिरवलं जात असल्याचं दिसून येते, त्यापाठोपाठ गावकरी महिलेला जबरदस्तीनं पुढे चालायला भाग पाडून जोरजोरात आरडाओरड करताना दिसत आहेत.
सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या घटनेबाबत पडताळणी केली असता ही पहिलीच घटना आहे असंही नाही यापूर्वीही या जिल्ह्यात अशा घटना घडल्या आहेत. अशा घटनेचे अनेक व्हिडीओ, बातम्या यूट्यूबवर प्रसारित झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना छापरी रनवास या गावातील आहे, पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी या घटनेतील ७ आरोपींना अटक करुन तात्काळ चौकशी सुरु केली होती.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत होतं की, लोकं महिलेला धक्का देत आहेत, आणि तिला जबरदस्तीनं पतीला खांद्यावर बसवून गावात फिरवलं जात आहे. इतकचं नाही तर तिच्या पतीलाही त्यासाठी मजबूर केले जात आहे. गावकऱ्यांच्या दबावामुळे महिलेला पतीला खांद्यावर घेऊन गावभर फिरावं लागलं. महिला तिच्या पतीला खांद्यावर बसवून गावातील रस्त्यावर चालत राहिली तर गावकरी तिच्या मागून नाचतगाजत त्यांची खिल्ली उडवत होते.
गर्दीतील कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियात व्हायरल केला. मात्र त्या महिलेच्या मदतीसाठी कोणीच पुढे सरसावलं नाही, झाबुआ कोतवाली पोलिसांनी ज्यावेळी हा व्हिडीओ व्हायरल झाला त्यानंतर घटनेची गांभीर्याने दखल घेत व्हिडीओत दिसणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.
A married woman in a tribal-dominated Jhabua was beaten up and shamed as her husband suspected her of having an affair She was forced to carry her husband on her shoulders as punishment @ndtv@ndtvindia@NCWIndia@sharmarekha@Shobha_Oza@PoliceWaliPblic@GargiRawat@RajputAditipic.twitter.com/9ARnY5X26D
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) July 30, 2020
पीडित महिला आणि तिचा पती गुजरातमध्ये रोजंदारीचं काम करतात. पत्नीने अन्य व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण सुरु असल्याचं पतीला संशय होता, कुटुंबाच्या लोकांनीही या शंकेच्या आधारे पीडितेसोबत अमानुष अत्याचार केले. झाबुला पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणाले की, पीडिताच्या तक्रारीनंतर ७ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. जिल्ह्यात ही पहिलीच घटना नाही तर अशाप्रकारे यापूर्वीही अमानुष अत्याचार झाले होते, मागील दीड महिन्यातलं हे दुसरं प्रकरण आहे. ज्यावेळी महिलेचा अशाप्रकारे अमानुष छळ होत होता त्यावेळी लोक तमाशा बघत होते, कोणीही या महिलेच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. मोबाईल कॅमेऱ्यात ही दृश्य कैद करण्यासाठी अनेकांची स्पर्धा सुरु होती अशी नाराजी पोलिसांनी व्यक्त केली.