कोर्टातील निकाल मॅनेज करण्यासाठी अडीच लाखांची लाच मागणारी महिला जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 11:43 PM2021-01-14T23:43:37+5:302021-01-14T23:44:01+5:30
क्रारदार यांची वडगाव मावळ कोर्टात केस प्रलंबित केस मॅनेज करुन निकाल त्यांच्या बाजूने लावण्यासाठी तिने तक्रारदाराकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती.
पुणे : वडगाव मावळ कोर्टात प्रलंबित केसचा निकाल मॅनेज करुन केसचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या महिलेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.
शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय २९, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे या महिलेचे नाव आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची वडगाव मावळ कोर्टात केस प्रलंबित आहे. ही केस मॅनेज करुन त्या केसचा निकाल त्यांच्या बाजूने लावण्यासाठी तिने तक्रारदाराकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. तिने आपण कोर्टात काम करीत असल्याचे तक्रारदाराला सांगितले होते. तसेच वडगाव मावळ कोर्टातील नाझरच्या कार्यालयात ही महिला तक्रारदाराला दिसली होती. तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्याची ८ व ९ जानेवारी रोजी पडताळणी केली. त्यानंतर तिने पैसे देण्यासाठी १३ जानेवारी रोजी अगोदर तळेगावला बोलावले. त्यानंतर बुधवारी दुपारी किवळे पुलाखाली बोलविले होते. त्याप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. तक्रारदाराकडून अडीच लाख रुपये स्वीकारताना गायकवाड हिला रंगेहाथ पकडण्यात आले. तिच्याविरुद्ध देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभावरी गायकवाड हिला आज विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त श्रीहरी पाटील यांनी दिली.
पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सीमा मेहेदळे अधिक तपास करीत आहे.