कपाळावर टिकली, हातात बांगड्या अन् साडी; मुलीप्रमाणे मेकअप करून विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 02:47 PM2022-12-13T14:47:11+5:302022-12-13T14:54:39+5:30
दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे.
पश्चिम बंगालमधील सिलीगुडीमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. कुटुंबीय घराबाहेर गेल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे एखाद्या महिलेप्रमाणे त्याने कपडे घातले होते. साडी नेसली होती. त्याच्या हातात बांगड्या व चेहऱ्यावर मेकअपही दिसत होता. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सिलीगुडी मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. पश्चिम बंगालच्या सिलीगुडी शहरातील दक्षिण शांतिनगर भागात हा धक्कादायक प्रकार घडला. आत्महत्या करणारा मुलगा दहावीत शिकत असून तो सध्या परीक्षेची तयारी करत होता. मुलाने आत्महत्या केली तेव्हा त्याचे कुटुंबीय घराबाहेर गेलेले होते. त्याने एखाद्या मुलीप्रमाणे हातात बांगड्या, टिकली आणि साडी नेसली होती. शेजाऱ्यामुळे हा प्रकार समोर आला.
विद्यार्थ्याच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, मुलाने गळफास घेतला तेव्हा त्याच्या घरातून मोठ्याने ओरडण्याचा आवाज झाला. तेव्हा शेजारी राहणारे नागरिक तत्काळ त्याच्या घरी पोहोचले. घरातली परिस्थिती पाहून सर्वांनाच धक्का बसला. मुलगा फासावर लटकलेला होता आणि त्याने महिलांप्रमाणे कपडे घातले होते. शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला.
मुलाला याआधी कधीही महिलांचे कपडे घातलेल्या स्थितीत पाहिलं नव्हतं. त्याची अशी आवड होती, असंही कधी जाणवलं नव्हतं. तो मुलगा फारच सभ्य होता. मुलाला कुठलंही व्यसन असल्याचंही कधीही दिसलं नव्हतं अशी माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. मुलाचा मृतदेह पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला असून अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"