सासरी झालेल्या मारहाणीमुळे विवाहितेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 03:23 AM2019-02-09T03:23:11+5:302019-02-09T03:23:22+5:30
सासरच्या मंडळींकडून झालेल्या मारहाणीमुळे सोनाली ऊर्फ दर्शना संदीप महाले (२५) हिचा मृत्यू झाल्याची तक्रार तिचे वडील रतन चोथे यांनी गुरुवारी शहापूर पोलीस ठाण्यात केली आहे.
शहापूर - सासरच्या मंडळींकडून झालेल्या मारहाणीमुळे सोनाली ऊर्फ दर्शना संदीप महाले (२५) हिचा मृत्यू झाल्याची तक्रार तिचे वडील रतन चोथे यांनी गुरुवारी शहापूर पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीअंती आणि तक्रारदाराच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक महेश शेट्ये यांनी सांगितले.
मोहिली येथील सोनाली ऊर्फ दर्शना संदीप महाले (२५) या पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून झालेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. वडिलांकडून दुचाकीसाठी पैसे आणण्यासाठी पती संदीप दत्तू महाले यांनी दर्शनाकडे तगादा लावला होता. सासरच्या इतर मंडळींकडून याबाबत मानसिक त्रास देऊन मारहाणही केली जात होती. याबाबत सोनालीने २० नोव्हेंबर २०१७ रोजी शहापूर पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली होती.
२ जानेवारी २०१९ ला सोनाली चक्कर येऊन पडली आणि तिचा मृत्यू झाल्याचे तिच्या पतीने कळवल्याचे रतन चोथे यांनी म्हटले. पैशांची मागणी पूर्ण न झाल्याने पती संदीप, सासू भीमाबाई, सासरा दत्तू, नणंद कविता आणि दीर योगेश महाले तिला मारहाण करत होते. यातच तिचा मृत्यू झाल्याची तक्रार सोनालीचे वडील रतन चोथे यांनी गुरुवारी शहापूर पोलिसांत केली.