पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 11:02 PM2020-07-06T23:02:37+5:302020-07-06T23:04:51+5:30
महिलेचा पती कामावर गेलेला होता. तर मुलगी किराणा दुकानात सामना आणण्यासाठी गेली होती. घरात कुणीच नव्हते, त्यावेळी तिने टोकाचं पाऊल उचललं.
मुंबई - पीएमसी बँक घोटाळ्यानंतर ठेवीदार असलेली ४५ वर्षीय रचना सेठ तणावात होत्या. बँकेतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर ही महिला तणावग्रस्त झाली होती. त्यानंतर 14 जून रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेचा महिलेच्या मनावर गंभीर परिणाम झाला. त्यानंतर तिने आत्महत्या केली, असं महिलेच्या कुटुंबीयांनी म्हणणे आहे.
१ जुलै रोजी मुलुंड परिसरात घटना घडली. ४५ वर्षीय रचना सेठ यांनी १ जुलै रोजी सकाळच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी या महिलेचा पती कामावर गेलेला होता. तर मुलगी किराणा दुकानात सामना आणण्यासाठी गेली होती. घरात कोणीच नव्हते, त्यावेळी तिने टोकाचं पाऊल उचललं.
“पीएमसी बँकेचा घोटाळा समोर आल्यानंतर ती प्रचंड तणावाग्रस्त जीवन जगत होती. गेल्या महिन्यात अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केली. त्यानंतर तिची परिस्थिती आणखी बिघडली होती,” असं रचना शेठ यांचे पती विशाल सेठ यांनी सांगितलं. विशाल सेठ हे मॅनेजर म्हणून नोकरीला आहेत.
“पीएमसी बँकेतील पैसे बुडाल्यामुळे कुटुंबाचं आर्थिक नुकसान झाल्याच्या कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून रचना मध्यरात्री उठून रडत बसायची. मागील काही आठवड्यांपासून ती सोबत ओढणी ठेवायची. त्यामुळे आम्ही नेहमी चिंतेत असायचो,” विशाल सेठ म्हणाले. विशाल सेठ यांचे पीएमसी बँकेत १५ लाखांपेक्षा पैसे जमा केलेले होते. आम्ही मागील काही महिन्यांपासून एका मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन तिला जात होतो,” असं देखील विशाल सेठ यांनी पुुढे सांगितलं.रचना सेठ यांची मुलगी कशीश सध्या बी.कॉमच्या अंतिम वर्षात शिक्षण घेते.