धुळ्याच्या तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; दीड महिन्यानंतर तक्रार, आरोपी प्रॉपर्टी डिलरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 11:12 PM2022-01-06T23:12:17+5:302022-01-06T23:12:30+5:30
गुळ घेऊन आलेल्या धुळ्याच्या एका तरुणीवर आपल्या वाहनात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सीताबर्डी पोलिसांनी एका प्रॉपर्टी डिलरला अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - गुळ घेऊन आलेल्या धुळ्याच्या एका तरुणीवर आपल्या वाहनात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सीताबर्डी पोलिसांनी एका प्रॉपर्टी डिलरला अटक केली.
राजेंद्र विशंभर थोरात (वय ५५) असे आरोपीचे नाव असून तो वर्धा मार्गावर राहतो. त्याचा मित्र छिंदवाड्याला (मध्यप्रदेश) राहतो. त्याची एक कंपनी असून या कंपनीत धुळ्याची तरुणी (वय २२) काम करते. कंपनीच्या कामाने ती नोव्हेंबर महिन्यात छिंदवाडा येथे गेली होती. त्याचवेळी थोरात याने त्याच्या मित्राला (तरुणी ज्या कंपनीत काम करते, त्याच्या संचालकाला) छिंदवाड्यात उच्च दर्जाचा गुळ मिळतो तो पाठव, असे म्हटले होते. त्यानुसार मित्राने तरुणी परत येत असताना तिच्याकडे गुळ आणि थोरातचा मोबाईल नंबर देऊन तो त्याच्याकडे सोपविण्यास सांगितले होते.
२२ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता तरुणी मध्यप्रदेश बसस्थानकावर आली अन् तिने थोरातला फोन करून गुळ घेऊन जाण्यासाठी बोलविले. थोरात त्याच्या कारने तेथे गेला. त्याने तरुणीला आपल्या वाहनात बसवून सीताबर्डीतील एका मोठ्या रेस्टॉरेंटमध्ये नेले. खाऊपिऊ घातल्यानंतर त्याने तिला फिरवण्याच्या बहाण्याने सदर पोलीस ठाण्यासमोरून सेमिनरी हिल्सला नेले. तेथे कार थांबवून त्याने तिच्याशी अश्लिल चाळे करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने तीव्र विरोध करून आरडाओरड केली. त्यामुळे तो घाबरला अन् त्याने तिला सीताबर्डीत आणून सोडले. यानंतर तरुणी आपल्या गावाला निघून गेली.
४४ दिवसांनंतर तक्रार
बुधवारी कंपनीच्या संचालकासह तरुणी नागपुरात आली आणि तिने सीताबर्डी ठाण्यात थोरातविरुद्ध अतिप्रसंगाची तक्रार नोंदवली. घाबरली होती. बदनामीचा धाक होता. मात्र, गावातील मित्र अन् कंपनी संचालकांनी धाडस दिल्याने तक्रार नोंदवित असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. ठाणेदार अतुल सबनिस यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करून त्याची ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळवली. आरोपी थोरातने गुन्ह्याचा ईन्कार केला आहे. मित्राकडे (कंपनी संचालक) रक्कम आहे, ती परत द्यायची नसल्याने त्याने कुंभाड रचल्याचे थोरात पोलिसांना सांगत आहे.