महिलेची दोन चिमुकल्यांसह गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 17:35 IST2019-07-18T17:33:17+5:302019-07-18T17:35:23+5:30
दोन चिमुकल्यांसह मातेने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९ वाजेदरम्यान उघडकीस आली.

महिलेची दोन चिमुकल्यांसह गळफास घेऊन आत्महत्या
वाशिम - दोन चिमुकल्यासह मातेने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९ वाजेदरम्यान उघडकीस आली. जयश्री गवारे असे मृतक महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, तोंडगाव माहेर असलेल्या जयश्री गजानन गवारे हिचे सासर जांभरूण नावजी ता. वाशिम असून सासरकडील मंडळीच्या त्रासाला कंटाळून जयश्री ही मोठा मुलगा गणेश (४) तर लहान मुलगा मोहित (२) या दोन चिमुकल्यासह गत एका वर्षापासून तोंडगाव येथे वडीलांच्या घरी राहत होती. १७ जुलै रोजी या प्रकरणावर सामोपचारातून तोडगा काढण्याचा प्रयत्न नातेवाईकांच्या उपस्थितीत झाला. मात्र, याला सासरकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. १८ जुलै रोजी सकाळी तोंडगाव येथील राहत्या घरात दोन मुलांसह जयश्री गवारे हीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेचा पुढील तपास वाशिम पोलीस करीत आहेत.
शवविच्छेदनास साडेचार तास विलंब
मृतक जयश्री गवारे हिच्यासह गणेश व मोहित यांचा मृतदेह सकाळी ११ वाजेदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. मात्र, येथे वैद्यकीय अधिका-यांसह संबंधित कर्मचारी उपस्थित नसल्याने तब्बल साडेचार तास विलंबाने शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकाराबद्दल रोष व्यक्त करण्यात आला.