दिराच्या प्रेमात पडली वहिनी, पतीला मारण्यासाठी बोलवले सुपारी किलर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 02:52 PM2022-08-02T14:52:21+5:302022-08-02T14:53:31+5:30
Crime News : पोलिसांनी सांगितलं की, पप्पूच्या हत्येसाठी नवगछियाच्या गोपालपूरहून शूटर्स बोलवून हत्याकांड घडवून आणलं. या हत्येचा खुलासा आरोपींच्या मोबाइल सीडीआरमधून झाला.
Crime News : बिहारच्या (Bihar) किशनगंजमधून पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने दिरासोबत मिळून सुपारी किलरकडून पतीची हत्या केली. पोलिसांनी एमजीएम मेडिकल कॉलेजमध्ये काम करणाऱ्या पप्पू हत्याकाडांचा खुलासा केला. पोलिसांनी दीर आणि वहिनीच्या षडयंत्राचा खुलासा करत मृतकाची पत्नी प्रीती गुप्ता आणि दीर राजू गुप्तासोबत शूटर सूरज याला अटक केली. या हत्याकाडांत सहभागी इतर शूटर्सचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी सांगितलं की, पप्पूच्या हत्येसाठी नवगछियाच्या गोपालपूरहून शूटर्स बोलवून हत्याकांड घडवून आणलं. या हत्येचा खुलासा आरोपींच्या मोबाइल सीडीआरमधून झाला. आरोपींना अटक करण्यासोबतच पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले मोबाइल फोन, पिस्तुल, चाकू आणि इतर साहित्यही ताब्यात घेतले. 26 जुलैला रात्री ड्युटीहून घरी येत असलेल्या पप्पूवर अज्ञातांनी गोळी झाडली. ज्यात तो जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली होती.
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधिकाऱ्यांनी एक टीम तयार केली. एसआयटीने टेक्नीकचा वापर करत घटनेत सहभागी लोकांची ओळख पटवली. त्यानंतर तीन गुन्हेगारांना अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान पोलिसांना समजलं की, मृतकाची पत्नीचं तिच्या दिरासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. पप्पू त्यांच्यात अडचण ठरत होता. ज्यामुळे ही हत्या करण्यात आली.
मृतकाची पत्नी प्रीती कुमारी एमजीएम हॉस्पिटलमध्ये बीएससी नर्सिंगच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थीनी आहे. पोलिसांना चौकशी दरम्यान समजलं की, दीर-वहिनीने पळून जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात त्यांना यश मिळालं नाही. त्यानंतर दोघांनी पप्पूचा खात्मा करण्याचा प्लान केला. यासाठी त्यांनी सुपारी किलरची मदत घेतली. एक लाख रूपयात डील झाली आणि 20 हजार रूपये अॅडव्हांस देण्यात आले. पप्पू गुप्ताची रेकी करण्यात आली. त्याच्यावर हल्ला झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.