भाईंदरमध्ये कामगारास मारहाण करून लुटले; पहाटेच्या वेळी घडला प्रकार
By धीरज परब | Published: September 1, 2022 03:25 PM2022-09-01T15:25:38+5:302022-09-01T15:25:51+5:30
पश्चिमेवरून पूर्वेला जाण्यासाठी फाटक येथील भुयारी मार्गातून चालले असताना सकाळी ६ च्या सुमारास मागून तिघेजण आले.
मीरारोड - भाईंदर पश्चिम - पूर्व जोडणाऱ्या फाटक येथील भुयारी मार्गात तिघा लुटारूंनी एका कामगारास मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. पहाटे व रात्री उशिरा लुटीच्या वाढत्या घटनां मुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पश्चिमेच्या गणेश देवल नगर मध्ये राहणारे करवीन बिनबंसी ( ३३ ) हे ३० ऑगस्ट रोजी सुमारास पूर्वेला कामावर चालले होते . नेहमी प्रमाणे पश्चिमेवरून पूर्वेला जाण्यासाठी फाटक येथील भुयारी मार्गातून चालले असताना सकाळी ६ च्या सुमारास मागून तिघेजण आले. त्यांनी बिनबंसी तास पकडून मारहाण करू लागले . बिनबंसी यांच्या खिशातील १० हजारांचा मोबाईल त्यांनी बळजबरी घेतला .
त्यांनी प्रतिकार सुरु केला असता ते तिघे पुन्हा पश्चिमेच्या दिशेला पळू लागले . बिनबंसी यांनी पाठलाग केला असता रेल्वे रुळाचे कडेला लावण्यात आलेल्या जाळीवरून उडी मारून रेल्वे रुळाकडे पळुन गेले. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .