कामगाराचे भारतात ऑपरेशन करायचंय; यूएसमधील मित्राच्या ईमेलमार्फत सीएची फसवणूक
By गौरी टेंबकर | Published: September 15, 2023 04:13 PM2023-09-15T16:13:20+5:302023-09-15T16:13:25+5:30
स्मिथच्या मेसेजवर विश्वास ठेवत १० सप्टेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास आयएमपीएस पद्धतीने संबंधित खात्यात २.९५ लाख रुपये जमा करून तसा मेसेजही त्याला पाठवला
मुंबई: माझ्या कंपनीचा कामगार आजारी असून मला त्याचे भारतात ऑपरेशन करायचे आहे. यासाठी २.९५ लाखांची गरज असल्याचा ई-मेल अमेरिकेतील एका मित्राच्या ईमेलवरून ५० वर्षीय भारतीय चार्टर्ड अकाउंटंटला मिळाला. त्यावर विश्वास ठेवत त्यांनी पैसे पाठवले जे सायबर भामट्यांनी लंपास केले. याप्रकरणी सांताक्रुज पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार सांताक्रुज पश्चिम येथील टागोर रोड परिसरातील इमारतीमध्ये राहतात. तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मित्र डग स्मिथ (४५) हा अमेरिकेत मॅगझिन एडिटर म्हणून काम करतो. तक्रारदार हे स्मिथ सोबत ईमेलद्वारे ऑनलाइन चॅटिंग करत संपर्कात आहेत. दरम्यान ८ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास स्मिथच्या इमेल वरून तक्रारदाराला मेसेज आला. ज्यात त्याच्या कंपनीचा कामगार आजारी असल्याने त्याच्यावर भारतात शस्त्रक्रिया करायची आहे. त्यामुळे गीता शाह नामक महिलेच्या बँक ऑफ इंडियामधील खात्यात तू पैसे पाठवशील का? अशी विचारणा करण्यात आली. तसेच ते पैसे परत करण्याचेही त्यात म्हटले होते.
स्मिथच्या मेसेजवर विश्वास ठेवत १० सप्टेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास आयएमपीएस पद्धतीने संबंधित खात्यात २.९५ लाख रुपये जमा करून तसा मेसेजही त्याला पाठवला. मात्र त्या रात्रीच ९ वाजता स्मिथकडून एक मेसेज आला. त्यात मला ५.९५ लाखाची गरज असून चुकून मी २.९५ असा उल्लेख केला असे लिहिण्यात आले. त्याचसोबत अजून ३ लाखाची मागणीही करण्यात आली. तेव्हा संभाषणावरून तक्रारदाराला संशय आला आणि त्यांनी स्मिथला संपर्क केला. तो न झाल्याने स्मिथच्या सहकाऱ्याला याबाबत माहिती दिली आणि त्याने असे कोणतेही पैसे मागितले नसल्याचे उघड झाले. याप्रकरणी तक्रारदाराने सांताक्रुज पोलीस ठाण्यात धाव घेतली.