जागतिक महिला दिनीच महिलेने धावत्या बसखाली उडी मारुन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 06:09 PM2021-03-08T18:09:52+5:302021-03-08T18:10:54+5:30
Suicide Case : सुमारे ६५ वय वर्षे तसेच नऊ वारी साडी नेसलेली महिला स्टेशन रोडवर व्हिनस कॉर्नरनजीक रस्त्यामध्येच आयलॅर्डवर बसली होती.
कोल्हापूर : कोल्हापूरात स्टेशन रोडवर ६५ वर्षीय एका वृध्देने सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास धावत्या एस.टी. बसच्या चाकाखाली स्वता:ला झोकूुन देऊन आत्महत्या केली. या महिलेचा जागीच मृत्यू झाला. नेहमी गजबजलेल्या या मार्गावर घटना घडल्याने काहीवेळ गोंधळ उडाला. पेहराव्यावरुन ही महिला ग्रामीण भागातील असावी असा पोलिसांचा अंदाज असून सायंकाळपर्यंत त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु होते. महिला दिनी महिलेवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याने घटनास्थळी नागरीकातून हळहळ व्यक्त केला जात होता.
सुमारे ६५ वय वर्षे तसेच नऊ वारी साडी नेसलेली महिला स्टेशन रोडवर व्हिनस कॉर्नरनजीक रस्त्यामध्येच आयलॅर्डवर बसली होती. सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकाकडून बाहेर पडलेली एस.टी. बस दसरा चौकाच्या दिशेने जात असताना त्या महिलेने धावत्या एसटी. बसच्या मागील चाकाखाली उडी मारुन आत्महत्या केली. बस चालकाच्या ही बाब लक्षात आली नाही. बसच्या पाठीमागून धावणार्या दुचाकीचालकांच्या ही बाब लक्षात आली, त्यांनी अपघातग्रस्त बस ही दसरा चौकात आडवली. संबधीत महिलेच्या पाठीवरुन बसचे चाक गेल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या होत्या. या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली. तातडीने १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या, त्यांनी मृतदेह तातडीने सीपीआर रु्ग़णालयात नेऊन रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी केली. सायंकाळपर्यत महीलेची ओळख पटली नव्हती.
संबधीत महिलाचे वय अंदाजे ६५ वर्षे असून त्यांच्या अंगावर हिरव्या रंगाची पांढरे टिपक्या असणारी साडी होती. पेहराव्यावरुन त्या ग्रामीण भागीतील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
स्टॅडवरुन हटवले
संबधीत महिलेने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरातही बसखाली झोपून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब आगार सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांना परिसरातून हटवले होते. पण त्यानंतर त्या स्टेशन रोडवर आल्या व त्यांनी आपली जीवनयात्रा एस.टी. बसखाली झोकून देऊन संपवलीच.
आत्महत्येचे व्हीडीओ चित्रण व्हायरल
संबधीत महिला बसखाली आत्महत्या करत असल्याचे परिसरातील सीसी टिव्ही कॅमेरातील फुटेज सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केला.