घायवळ, मारणे, पोटे समजले का? कुख्यात गुन्हेगारांची पोलीस आयुक्तालयात परेड
By विवेक भुसे | Published: February 6, 2024 10:26 PM2024-02-06T22:26:22+5:302024-02-06T22:27:04+5:30
पोलिस आयुक्तांनी दिला इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एखाद्या राज्याप्रमाणे दरबार भरविणारा महाराज, कंपनीप्रमाणे गुंडांची टोळी चालविणारा निल्या, राजकारण्यांशी घनिष्ट संबंध ठेवून टोळी चालविणारा सुर्या, चौकात उभे राहिला तर दुकानदार पटापट दुकाने बंद करणारे गल्ली बोळातील गुंड आज पोलिस आयुक्तालयात हात जाेडून उभे होते. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे त्यांचे नाव घेऊन सूचना देत होते. काय घायवळ, मारणे, पोटे समजले का असे विचारल्यावर शहरात दहशत पसरविणारे हे कुख्यात गुंड मान खाली घालून हात वर करुन ऐकत होते. पुणे शहर पोलिस आयुक्तालयात शहरातील ३२ टोळ्यांतील टोळी प्रमुखांसह २६७ गुन्हेगारांची परेड मंगळवारी घेण्यात आली.
यावेळी पोलिसांनी डोजिअर फॉर्म देखील भरून घेण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे गुन्हेगारी टोळ्यांना समोरासमोर बोलावून सज्जड दम देण्यात आल्याचे दिसून आले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी पुणे शहर पोलिस आयुक्त पदाची सुत्रे स्विकारली. सर्वप्रथम त्यांनी पोलीस अधिकार्यांची बैठक घेऊन अवैध धंदे आणि मांडवली बंद करण्याचे आदेश दिले. यानंतर शहरातील सर्व गुन्हेगारांची कुंडली नव्याने तयार करण्यास सांगण्यात आले. या सर्व गुन्हेगारांची आज(मंगळवार) पोलीस आयुक्तालयात परेड घेण्यात आली. शहरातील जुन्या ११ टोळ्या आणि रायझिंग २१ टोळ्यांतील २६७ गुन्हेगारांची पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनिल तांबे आणि सतिश गोवेकर यांनी झाडाझडती घेतली. त्यांना कोणत्याची प्रकारे रिल्स न बनविण्याची तसेच गुन्हे न करण्याची तंबी देण्यात आली.
दरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, गुन्हेगारांची सविस्तर कुंडली तयार करण्यात येणार आहे. ती डिजिटल स्वरुपातही रेकॉर्डला ठेवण्यात येईल. तसेच रायझिंग टोळ्या आणि अल्पवयीन गुन्हेगारांचे मनपरिवर्तन करण्यात येईल. मी येथे येण्याअगोदर काय झाले माहित नाही, मात्र आता यापुढे कोणतेही गुन्हेगारी कृत्य होता कामा नये. ‘गुन्हेगारांनी कायद्याशी खेळू नये, अन्यथा आम्ही त्यांच्याशी खेळू’ अशा शब्दांत इशारा दिला.
बाबा बोडके, गजानन मारणे , गणेश मारणे आणि निलेश घायवळ एकाच रांगेत
शहरातील जुन्या टोळ्यांचे एकमेकांशी कट्टर वैमनस्य असलेले टोळी प्रमुख प्रथमच एका रांगेत उभे राहिलेले बघायला मिळाले. यामध्ये बाबा बोडके, गजानन मारणे, गणेश मारणे आणि निलेश घायवळ यांचा समावेश होता. एकमेकांशी वैमनस्य असले तरी येताना शिस्तीत आणि जातानाही ते शिस्तीत गेल्याचे दिसले.
गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रिल्स् तयार करून प्रसारित करणार्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. त्यासाठी सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले आहे. यापुढे शहरात कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य खपवून घेतले जाणार नाही.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त पुणे शहर