सर्वसाधारण गटातच चुरशीच्या लढती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 09:58 PM2020-01-01T21:58:14+5:302020-01-01T21:58:47+5:30
ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण तापले : कॉँग्रेसच्या बालेकिल्यात भाजपच्या चार जागा बिनविरोध
अतुल जोशी।
धुळे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अंतिम टप्यात आलेली आहे.शिरपूर तालुक्यात आतापर्यंत तीन गट व एक गणाची जागा बिनविरोध झाली असून, या चारही जागांवर भाजपने कब्जा केलेला आहे. उर्वरित गट व गणांवर वर्चस्व राखण्यासाठी सर्वच पक्षांचे नेते सरसावले आहे. त्यातही तालुक्यातील चार सर्वसाधारण गटांच्या लढतीकडेच सर्वांचे लक्ष केंद्रीत झालेले आहे. या लढती अत्यंत चुरशीच्या होणार असल्याने सर्वांनी त्याठिकाणच्या जागा निवडून आणण्यासाठी कसोसीशीने प्रयत्न सुरू केले आहेत. तालुक्यातील काही गटांमध्ये जातीय समिकरणे महत्वाची ठरणार आहे. या तालुक्यात प्रथमच भाजपला वर्चस्व निर्माण करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने तालुक्यातील गट व गणातील काही गावांचा दौरा केला असता वरील स्थिती आढळून आली.
शिरपूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे १४ गट व २८ गण आहेत. तालुक्यात सुरवातीपासूनच कॉँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. पूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातील अनेक कॉँग्रेसचे सदस्य बिनविरोध निवडणून यायचे. तर भाजपला बोटावर मोजण्याएवढ्या जागा मिळायच्या. मात्र विधानसभा निवडणुकीपासून येथील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी भाजपत प्रवेश केल्याने, माघारीच्या दिवसापर्यंत भाजपचे वाघाडी, पळासनेर व कोडीद या गटातील व वाघाडी गणातील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता ११ गट व २७ गणांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान या तालुक्यात महाविकास आघाडी अस्तित्वात येऊ शकलेली नाही. पहिल्यांदा कॉँग्रेस सर्वात कमी जागा लढवित आहे. तर भाजपला पहिल्यांदा जास्त जागा जिंकण्याची संधी आहे.
सर्वसाधारण गटाच्या
लढतींकडे लक्ष
यावेळी जि.प.चे अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण निघालेले आहे. तालुक्यात ११ पैकी विखरण, वनावल, शिंगावे, भाटपुरा हे चारच गण सर्वसाधारण आहेत. विखरण गटात डॉ़तुषार रंधे, (भाजप), चंद्रकांत युवराज पाटील(राष्ट्रवादी), उदयराव शामराव पाटील, (अपक्ष)़ यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. तर वनावल गटात कॉँग्रेसने तर भाटपुरा गटात राष्टÑवादीने माघार घेतल्याने, याठिकाणी भाजपचा सामना अपक्ष उमेदवाराशी होणार आहे. तर शिंगावे गटात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेंद्र जयराम पाटील, करवंद (भाजपा), शिरीष मनोहर पाटील, शिंगावे (राष्ट्रवादी), प्रविण चंद्रसिंग देशमुख, (अपक्ष) यांच्यात सरळ लढत होणार आहे. याशिवाय हिसाळे, थाळनेर, तºहाडी, दहिवद, रोहीणी, सांगवी, बोराडी हे गट राखीव असल्याने, या ठिकाणी समोरासमोर लढत आहे. यात कोण बाजी मारते याचे वेध लागले आहेत.