वर्ध्याच्या मैत्रिणीचे घरातून पलायन; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे पोलिसांना घेता आला बेपत्ता मुलींचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 08:50 PM2018-10-01T20:50:16+5:302018-10-01T20:51:01+5:30
त्या रिक्षाचालकाने प्रिन्सीच्या आईला कॉल करून मुली मुंबईत असल्याची खबर दिली. त्यानंतर प्रिन्सीच्या आईने तात्काळ पोलिसांना संपर्क साधून त्या रिक्षाचालकांचा संपर्क क्रमांक दिला आणि त्यामुळेच पोलिसांना या दोन्ही हरवलेल्या मुलींचा शोध घेणं सोपं झालं.
मुंबई - वर्धा जिल्ह्यात राहणाऱ्या १६ वर्षीय प्रिन्सी तेजपाल आणि जीविता बगाडे या अकरावी इयत्तेत शिकणाऱ्या मुली घरात पालकांशी सतत होणाऱ्या वादाला कंटाळून काल सकाळी ट्रेनने मुंबईत आल्या. एका रिक्षेतून त्या जुहू चौपाटी फिरल्या. मात्र, दरम्यान रिक्षाचालकास शंका आल्याने त्याने या दोन्ही मुलींची कसून चौकशी करत प्रिन्सीच्या आईचा संपर्क क्रमांक मिळविला. त्यानंतर त्या रिक्षाचालकाने प्रिन्सीच्या आईला कॉल करून मुली मुंबईत असल्याची खबर दिली. त्यानंतर प्रिन्सीच्या आईने तात्काळ पोलिसांना संपर्क साधून त्या रिक्षाचालकांचा संपर्क क्रमांक दिला आणि त्यामुळेच पोलिसांना या दोन्ही हरवलेल्या मुलींचा शोध घेणं सोपं झालं.
प्रिन्सीला दहावीनंतर आर्ट शाखेतून पुढचे शिक्षण घ्यायचे होते. मात्र पालकांनी दबावाखाली तिला जबरदस्तीने सायन्स शाखेत कॉलेजचे प्रवेश घेऊन दिले. त्यामुळे मनाविरुद्ध पालकांनी कॉलेजचे ऍडमिशन केल्याने प्रिन्सी आणि तिच्या आई - वडिलांमध्ये सतत भांडण होतं असे. त्यानंतर कंटाळून प्रिन्सीने मैत्रीण जीविताच्या मदतीने घर सोडून मुंबईत जाऊन स्वतः पैसे कमवून शिक्षण घेण्याचे ठरविले. कारण जीविता घरी देखील सारखीच परिस्थिती होती. सततच्या भांडणाला कंटाळून या दोघींनी वर्ध्याहून शनिवारी निघाल्या. प्रिन्सीने आईच्या मोबाइलवरून मुंबईत जाणाऱ्या ट्रेनची माहिती जमा केली होती. त्यानंतर या दोघींनी ट्रेन पकडून काल सकाळी मुंबई गाठली आणि कुर्ला टर्मिनसला उतरल्या. मात्र, या दोघींचे पालक मुंबईत आपले कोणीच नातलग नसल्याने अस्वस्थ झाले होती. नंतर त्यांनी सावंगी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल दाखल केली. याप्रकरणी माहिती वर्ध्यातील पोलिसाने त्यांच्या वर्गमित्र असलेल्या मुंबईतील गुन्हे शाखा कक्ष - ३ च्या अंमलदाराला माहिती दिली. त्यानंतर कक्ष - ३ ने देखील या मुलींच्या शोध मोहिमेस सुरुवात केली होती. दरम्यान, चतुर रिक्षाचालकाने या मुली गावाकडच्या असून त्या मुंबईत नवीन असल्याचा संशय आल्याने त्यांची चौकशी करायला सुरुवात केली. नंतर प्रिन्सीला आईचा संपर्क क्रमांक विचारला. रिक्षाचालकाने आईला संपर्क साधून मुली सुरक्षित असल्याचे सांगितले. त्याचबरोबर पालकांनी पोलिसांना त्या रिक्षाचालकाचा संपर्क क्रमांक देऊन त्यांचे शोधकार्य सोपे केले. नंतर पोलिसांच्या सांगण्यावरून रिक्षाचालक त्या मुलींना रिक्षातून फिरवत माहुल गावात घेऊन आला आणि तिथेच पोलिसांनी त्या दोघींना काल दुपारी ताब्यात घेतले आणि आज दुपारी त्यांच्या पालकांकडे पोलिसांनी सुपूर्द केले.