झेरॉक्स काढून येतो सांगितले अन् दक्षता समिती बाहेर येताच फिनाईल केले प्राशन
By सागर दुबे | Published: April 20, 2023 03:45 PM2023-04-20T15:45:26+5:302023-04-20T15:50:50+5:30
या तरूणावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी दिली.
जळगाव : मी कागदपत्रांची झेरॉक्स काढून येतो असे वडिलांना सांगून पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील महिला दक्षता समितीच्या कार्यालयाबाहेर निघाल्यानंतर अनंता अशोक उमाळे (३०,रा.वरणगाव) या तरूणाने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडला. या तरूणावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी दिली.
वरणगाव येथील अनंता उमाळे हा तरुण मुंबईतील एका कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला आहे. दोन वर्षांपूर्वी त्याचा भुसावळातील एका तरुणीसोबत विवाह झाला. मात्र, कौटूंबिक वादातून सहा महिन्यांपासून पत्नी माहेरी राहत आहे. काही महिन्यांपूर्वी पत्नीने उमाळे यांच्याविरूध्द पोलिस अधीक्षक कार्यालय आवारातील महिला दक्षता समितीकडे तक्रार केली आहे. त्यामुळे गुरूवारी पती-पत्नी आपआपल्या कुटुंबियांसह महिला दक्षता समिती येथे तारखेवर आले होते. समितीकडून दोघांमध्ये तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पती-पत्नीमध्ये तडजोड न झाल्यामुळे त्यांच्याकडून लेखी लिहून समितीने दोघांना न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.
बॉटल काढून प्यायला फिनाईल...
दक्षता समितीत दोघांकडून लेखी स्वरुपात लिहून घेतल्यानंतर उमाळे हा मी कागदपत्रांची झेरॉक्स काढून आणतो असे वडीलांना सांगून कार्यालयाबाहेर बाहेर जावू लागला. त्याचवेळी बॉटलमध्ये आणलेले फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तो खाली कोसळला. त्याच्या कुटूंबियांसह इतर पोलिस कर्मचारी व नागरिकांनी त्याला उचलून रिक्षातून जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ हलविले. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मुलगा त्याच्या पत्नीला नांदविण्यास तयार होता, तिने नकार दिल्यानंतर त्याने कार्यालयाबाहेर येवून फिनाईल पिल्याचे अनंता याच्या कुटूंबियांनी सांगितले.