Yes Bank Scam : सीबीआयकडून वाधवानांच्या बंगल्याची झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 07:56 PM2020-05-06T19:56:18+5:302020-05-06T20:00:13+5:30
Yes Bank Scam : महाबळेश्वरमध्ये पाच तास तपास, पथकासह दोघे बंधू मुंबईकडे
महाबळेश्वर : येस बँक आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीबीआय कोठडीत असलेल्या वाधवान बंधूंना तपासासाठी बुधवारी महाबळेश्वरात आणण्यात आले होते. यावेळी सीबीआयच्या विशेष तपास पथकाने वाधवान यांच्या बंगल्याची झाडाझडती घेतली. जवळपास पाच तास तपास केल्यानंतर सायंकाळी वाधवान बंधूंना सोबत घेऊन पथक मुंबईकडे रवाना झाले.
Coronavirus : चिंताजनक! जीटी हॉस्पिटलमधून कोरोनाग्रस्त रुग्ण पळाला
कसाबची ओळख पटवणारा कुटुंबाला झाला नकोसा, 'तो' रस्त्यावरच पडलेला आढळला
उद्योगपती धीरज वाधवान व कपील वाधवान यांच्यावर येस बँकेतील आर्थिक घोटाळ्याचा आरोप आहे. सीबीआयच्या पथकाने २३ एप्रिलला महाबळेश्वरमधील बंगल्यातून वाधवान यांना ताब्यात घेतले होते. तेव्हापासून वाधवान हे सीबीआय कोठडीत आहेत. तर ७ मेपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आलेली आहे. दरम्यान, बुधवारी सीबीआयचे विशेष तपास पथक वाधवान बंधूंना घेऊन महाबळेश्वर येथील त्यांच्या बंगल्यावर आले. सीबीआयच्या दोन विशेष वाहनातून त्यांना दुपारी येथे आणण्यात आले होते. महाबळेश्वरला येण्यापूर्वी स्थानिक पोलिसांनाही माहिती देण्यात आली होती.
सीबीआयच्या सूचनेनुसार दुपारी बारा वाजता स्थानिक पोलिसांचे पथक वेण्णालेक येथे पोहोचले. तेथून सीबीआयच्या पथकाबरोबर सर्वजण वाधवान हाऊस येथे गेले. या ठिकाणी स्थानिक पोलिसांना बाहेर थांबवून सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने तब्बल पाच तास तपास केला. यावेळी बंगल्याची झाडाझडती घेत कागदपत्रांची पाहणी केली. तसेच याप्रकरणी पुन्हा वाधवान बंधूंचे जबाब नोंदविण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता वाधवान बंधूंना सोबत घेऊन सीबीआयच्या पथकाने स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावली. येथील सोपस्कार पूर्ण करून सायंकाळी साडेपाच वाजता सीबीआयच्या तपास पथकाने मुंबईकडे कूच केली.