Yes Bank Scam : वाधवान बंधूना 4 मेपर्यंत सीबीआय कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 04:47 PM2020-04-27T16:47:29+5:302020-04-27T16:49:10+5:30
सोमवारी त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना आठ दिवसाचा रिमांड दिला.
मुंबई - येस बँकेच्या हजारो कोटीच्या गैरव्यवहाराप्रकरणी डीएचएलएफचे प्रमोटर्सचा कपिल वाधवान आणि त्याचा भाऊ धीरज वाधवान यांना केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाची (सीबीआय ) ४ मे पर्यंत कोठडी मिळाली. सोमवारी त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना आठ दिवसाचा रिमांड दिला.
वाधवान बंधूना सीबीआयने रविवारी सातारा पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. येस बँकेच्या 37000 कोटीच्या कर्ज मंजुरीच्या बदल्यात त्याने बँकेचा प्रमुख राणा कपूर व त्यांच्या कुटूंबियाच्या परदेशातील बँक खात्यावर 600 कोटीची लाच दिल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यानुसार त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार ( मनी लाड्रिंग प्रतिबंध कायद्यानवे ) सीबीआयने 7 मार्चला गुन्हा दाखल केला आहे. 17 मार्चला दोघांविरुद्ध अजामीन पात्र वारन्ट जारी केले होते. मात्र वाधवान बंधूंनी कोरोना विषाणूच्या संसर्गाचे कारण सांगत हजर होण्याचे टाळले होते.
8 व 9 एप्रिलला खंडाळा ते महाबळेश्वर पाच आलिशान गाड्यातून ते कुटूंबातील एकूण 23 सदस्यांसमवेत पर्यटन करीत असताना सातारा पोलिसांना सापडले. प्रवासासाठी त्यांनी गृह विभागातील प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी त्यांना स्वतःच्या लेटरहेडवर पत्र दिले होते. जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर ते 15 दिवस होम क्वारटाईन झाले. हा कालावधी पुर्ण झाल्यानंतर सातारा पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांच्याकडून सीबीआयने आपल्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे. आठ दिवस त्यांची कसून चॊकशी केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.