Siddhu Moosewala : 'हो माझ्या गॅंगनेच मुसेवालाचा खून केला', तिहार तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 04:40 PM2022-06-03T16:40:22+5:302022-06-03T17:14:53+5:30
Siddhu Moosewala : यासोबतच लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की, विकी मिड्दुखेडा कॉलेजच्या काळापासून माझा मोठा भाऊ होता, आमच्या ग्रुपने त्याच्या मृत्यूचा बदला घेतला आहे.
पंजाबी गायक सिद्धू मूसवाला (Siddhu Moosewala) हत्याकांडप्रकरणी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) अखेर आपला गुन्हा कबूल केला आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान (Police Enquiry) लॉरेन्स बिश्नोईने कबूल केले की, हो आमच्या गॅंगतील सदस्याने मूसेवालाची हत्या केली आहे. यासोबतच लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की, विकी मिड्दुखेडा कॉलेजच्या काळापासून माझा मोठा भाऊ होता, आमच्या ग्रुपने त्याच्या मृत्यूचा बदला (Death revenge) घेतला आहे.
तिहार तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई म्हणाला, 'यावेळी हे काम माझे नाही कारण मी सतत तुरुंगात होतो आणि फोन वापरत नव्हतो, पण सिद्धू मुसेवालाच्या हत्येत आमच्या टोळीचा हात असल्याची मी कबुली देतो.' लॉरेन्सने कबूल केले की, पंजाबमधील एक प्रसिद्ध गायक देखील त्याचा भाऊ आहे. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ते नाव उघड करता येत नाही.
दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सांगितले की, तिहार तुरुंगात टीव्ही पाहून मला सिद्धू मुसेवाला हत्याकांडाची माहिती मिळाली. लॉरेन्स बिश्नोईच्या कबुलीजबाबावरून कॅनडात बसलेल्या गोल्डी ब्रारशिवाय तुरुंगाबाहेरून आपली टोळी चालवणारा सचिन बिश्नोई याचाही सिद्धू मुसेवालाच्या हत्येत हात असल्याचे स्पष्ट झाले.
मूसेवाला हत्याकांडाचे अनेक कनेक्शन समोर आले आहेत
मानसा येथे पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येला ५ दिवस झाले आहेत. या हत्येत पंजाबपासून दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश... अगदी कॅनडापर्यंतचे कनेक्शन समोर आले आहे. हत्येपूर्वी आणि हत्येनंतर सिद्धूच्या घराबाहेर धावणाऱ्या वाहनांची सीसीटीव्ही फुटेजही सापडली आहेत. खुनानंतर पळून जाण्यासाठी दरोडेखोरांनी लुटलेली अल्टो कारही पोलिसांनी जप्त केली आहे. दुसरीकडे, खुद्द गुंडांनीही या हत्येत आपला हात असल्याची कबुली सोशल मीडियावर दिली, मात्र इतके सुगावा लागूनही पोलिसांचे हात अद्याप शूटर्सपर्यंत पोहोचलेले नाहीत. सध्या पोलिस लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करत आहेत.
सिद्धू मुसेवालाच्या हत्येत वापरण्यात आलेल्या कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. उत्तराखंडमधून तीन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर शस्त्रास्त्रांचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. पोलीस या सर्वांची चौकशी करत आहेत. शिवाय, गोळीबार करणाऱ्यांच्या अनेक साथीदारांना अटकही केली, पण तपास पुढे सरकू शकला नाही. उलट आता या प्रकरणात काही नवीन नावे समोर आली आहेत.