योगी आदित्यनाथांची 'सापशिडी'! भ्रष्टाचारी डीएसपी थेट शिपाई झाला; खालच्या पदावर डिमोशन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 12:00 PM2022-11-02T12:00:51+5:302022-11-02T12:01:51+5:30
योगी आदित्यनाथांनी भ्रष्टाचाराविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी राबविली आहे. गुन्हेगारांच्या मालमत्तांवर बुलडोझर चालविण्याबरोबरच त्यांना शिक्षाही देण्याचे धाडस त्यांनी दाखविले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी गुन्हेगार आणि भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाईचा प्रघात पाडला आहे. गुन्हेगारांच्या मालमत्तांवर बुलडोझर चालविण्याबरोबरच त्यांना शिक्षाही देण्याचे धाडस त्यांनी दाखविले आहे. एवढेच नाही तर न्यायालयीन लढाईतही ही बुलडोझर कारवाई योग्य कशी ते पटवून देत, गुन्हेगारांना दिलासा मिळण्याचे सर्व मार्गच बंद केले आहेत. आता तर त्यांनी बड्या पोलीस अधिकाऱ्याला थेट शिपाई पदावर नेऊन ठेवले आहे.
योगी आदित्यनाथांनीभ्रष्टाचाराविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी राबविली आहे. काही दिवसांपूर्वी रामपूर नगरचे डीएसपी किशोर शर्मा यांचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या डीएसपींवर थेट डिमोशन करण्याची कारवाई करण्याचे आदेश योगी आदित्यनाथांनी दिले आहेत. यामुळे डीएसपी पदापर्यंत पोहोचलेल्या अधिकारी त्यांच्या मुळ पदी म्हणजेच शिपाई पदावर पदावनती करण्यात आली आहे.
विद्या किशोर शर्मा यांना २०२१ मध्ये रामपूरमध्ये पदोन्नती देण्यात आली होती. मात्र, लाच घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करत बदली करण्यात आली होती, तसेच चौकशीही सुरु करण्यात आली होती. या चौकशीत शर्मा दोषी आढळल्या आहेत. यामुळे योगी आदित्यनाथांनी त्यांना शिपाई बनविले आहे.
याची महिती गृह विभागाकडून ट्विट करण्यात आली आहे. रामपूरमधील तत्कालीन डीएसपी विद्या किशोर शर्मा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी आढळल्याने त्यांच्या मूळ पदावर परत पाठविण्यात आले आहे.
काय होते प्रकरण...
स्वामी विवेकानंद कंपनीचे संचालक विनोद यादव आणि इंस्पेक्टर रामवीर यादव यांनी एका महिलेवर सामुहिक बलात्कार केला होता. य़ा प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप या महिलेने केला होता. तसेच यासाठी ५ लाख रुपयांची लाच घेतल्याचेही म्हटले होते. याचा व्हिडीओ देखील तिने पुरावा म्हणून दिला होता.