यूपीत गदारोळानंतर योगी सरकार ॲक्शन मोडमध्ये, 'हायलेव्हल' बैठक अन् 116 जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 09:41 PM2022-06-10T21:41:44+5:302022-06-10T21:42:21+5:30
Yogi Government in Action Mode : अशा परिस्थितीत योगी सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. राज्यात आतापर्यंत 116 जणांना अटक करण्यात आली आहे.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त टिपण्णी करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे भाजपमधून निलंबित करण्यात आले. मात्र, त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शुक्रवारी नमाजानंतर देशातील अनेक शहरांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौपासून अनेक शहरांमध्येही हिंसाचार पाहायला मिळाला. अशा परिस्थितीत योगी सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. राज्यात आतापर्यंत 116 जणांना अटक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत: वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीत सद्य परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत अशा समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सरकारने अधिकाऱ्यांना दिल्याचे बोलले जात आहे. कायदा हातात घेणाऱ्यांना कठोर धडा शिकवला जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे. दरम्यान, कारवाई करत प्रशासनाने सहारनपूरमध्ये 38, हाथरसमध्ये 24, आंबेडकर नगरमध्ये 23, प्रयागराजमध्ये 22, मुरादाबादमध्ये 7 आणि फिरोजाबादमध्ये 2 जणांना अटक केली आहे.
प्रयागराजमध्ये हिंसाचार करणाऱ्यांविरोधात पोलिसांची कडक कारवाई
सहारनपूरचे एसएसपी म्हणाले की, गोंधळ प्रकरणी पोलिसांनी 38 जणांना अटक केली आहे. याशिवाय हाथरसमध्ये 24 जणांना अटक करण्यात आली आहे. हाथरसमध्ये झालेल्या गदारोळानंतर रस्त्यांवर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. डीआयजी दीपक कुमार म्हणाले की, हे एक छोटे शहर आहे, दगडफेक झाली आहे, कडक कारवाई केली जात आहे, शांतता राखली जात आहे.
मात्र, आठवडाभर याच विधानावरून प्रचंड दंगल झालेल्या कानपूरमध्ये सर्वसाधारणपणे शांतता होती. कडक पोलीस बंदोबस्तामुळे कानपूरमध्ये कोणताही गोंधळ झाला नाही. पण इतर शहरांमध्ये पोलिसांना अशी भीती नव्हती, तरीही नमाज्यांनी घोषणाबाजी केली आणि गोंधळ झाला. यानंतर उत्तर प्रदेश सरकार कारवाईच्या मोडमध्ये आले आहे.
राज्यातील विविध शहरांमध्ये दगडफेकीच्या घटनांनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आंदोलकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ACS गृह अवनीश अवस्थी, कार्यवाहक DGP, ADG कायदा आणि सुव्यवस्था सारखे अधिकारी पोलिस मुख्यालयातून परिस्थितीवर करडी लक्ष ठेवून आहेत. सर्व जिल्ह्यांतून अहवाल मागवले जात आहेत.