'तू मला अटक करु शकत नाही'; आसारामने धमकावल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने काय केलं? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 09:46 AM2020-08-31T09:46:16+5:302020-08-31T09:48:11+5:30
२०१३ मध्ये आसारामला अटक केलेल्या पोलीस पथकाचं नेतृत्व करणारे आयपीएस अधिकारी अजयपाल लांबा यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.
जयपूर – बलात्कार प्रकरणात दोषी असलेल्या आसाराम बापूच्या अटकेची घटना आता पुस्तकाच्या माध्यमातून बाजारात उपलब्ध होणार आहे. अटकेच्या वेळी पळापळ, पोलिसांनी मीडियाला चकमा देण्यासाठी बनवलेल्या कथा आणि आसाराम यांनी पोलिसांना दिलेली विधानं याचा पुस्तकात समावेश आहे. अटक करताना आसाराम बापूने पोलिसांवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला होता असं पुस्तकातून समोर आलं आहे.
आसाराम बापू अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांना सांगतात की, तुमच्या मोबाइलवर एक कॉल येईल. तुम्ही मला अटक करू शकत नाही त्यानंतर, त्या पोलीस अधिकाऱ्याने आपल्या मोबाईलचं काय केले हेदेखील पुस्तकात सांगितलं आहे. २०१३ मध्ये आसारामला अटक केलेल्या पोलीस पथकाचा कार्यभार सांभाळणारे आयपीएस अधिकारी अजयपाल लांबा यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. त्याचं नाव 'Gunning for the Godman: The True Story Behind Asaram Bapu’s Conviction' असं आहे.
इंग्रजी वेबसाइट इंडियन एक्स्प्रेसने या पुस्तकाच्या रंजक गोष्टींचा रिपोर्ट प्रकाशित केला आहे. पुस्तकातील एका ठिकाणी आसाराम आणि पोलीस यांच्यातील संवादांचा उल्लेख अशा प्रकारे केला आहे, “बापू, तुम्ही काय केले ते मला सांगा असं पोलीस अधिकाऱ्यांनी ठणकावून विचारलं तेव्हा बापू म्हणाले, मी चूक केली, मी चूक केली असं ते म्हंटले. पुस्तकात आसारामला अटक करण्यासाठी पोलिसांची टीम पोहोचली त्या वेळेचा उल्लेख आहे. तेव्हा आसाराम पोलीस अधिकाऱ्याला म्हणाले तू हे करु शकत नाही. तुला वरुन आदेश येईल त्यानंतर तू मला अटक करू शकणार नाहीस. आसारामने पोलिसांवर आपला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्याला उत्तर म्हणून अधिकाऱ्याने त्याच्या खिशातून मोबाईल काढून फोन बंद केला.
मुलीला शाळेत पाठवणंही बंद केले.
आसाराम बापूला ७ वर्षांपूर्वी अटक केली गेली होती. परंतु आयपीएस अधिकारी अजयपाल लांबा, ज्यांनी बलात्काराच्या दोषी आसारामला अटक केलेल्या पोलिस पथकाचे नेतृत्व केले होते. रिपोर्टनुसार अजयपाल लांबा म्हणतात की, त्यांना आसारामच्या समर्थकांकडून धमक्यांचे फोन येत होते. या धमक्यांना घाबरून त्याच्या पत्नीने एकदा आपल्या मुलीला शाळेत पाठविणे बंद केले होते. जेव्हा मी पुस्तक लिहितोय हे समजल्यानंतरही आसारामच्या समर्थकांनी धमक्या देणं सुरु केले असं जयपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अजयपाल लांबा यांनी सांगितले.
इतर बर्याच अधिकाऱ्यांनी कायदेशीर बाबींचा अभ्यास केला, काहीजण चौकशीत गुंतले, तर काहींनी सायबर कौशल्याच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आणण्यास मदत केली. त्यावेळी अजयपाल लांबा जोधपूर पश्चिमचे डीसीपी होते, आसारामला अटक करण्यासाठी मी मीडियाचा पुरेपूर फायदा घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की, पत्रकार परिषदेत त्यांनी मीडियाला धूम ठोकली की आसारामला अटक करण्यासाठी एक टीम पाठवण्यात आली आहे. तेवढ्यात ही पत्रकार परिषद पाहत असलेल्या त्यांच्या मित्राने सांगितले की, आसाराम भोपाळ विमानतळावर दिसले होते. लांबा यांनी ही माहिती माध्यमांना दिली.
...अन् आसाराम जाळ्यात अडकला
मला पाहिजे होते तसे घडले, त्यानंतर आसारामच्या सर्व हालचालींवर माध्यमांनी नजर ठेवण्यास सुरुवात केली, त्यानंतर मला त्यांच्यावर पाळत ठेवण्याची काहीच गरज नव्हती. तो माणूस घाबरून पळायला लागला आणि आम्ही टाकलेल्या जाळ्यात तो सहजपणे अडकला. समर्थकांचा तीव्र विरोध असूनही आसाराम अखेर इंदूरला पोहोचले जेथे त्याला अटक करण्यात आली असं अजयपाल लांबा म्हणतात.
एप्रिल २०१८ मध्ये जोधपूर विशेष कोर्टाने आसारामला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरवले. पोक्सो कायद्यानुसार कोर्टाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा (मृत्यूपर्यंत) आणि एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.