'तुने माँ की कसम पुरी कर दी'; तरुणाच्या हत्येनंतर आरोपीच्या भावाची प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:30 PM2019-11-01T12:30:09+5:302019-11-01T12:33:29+5:30
कुऱ्हाडीचे घाव घालून एकाचा शाहनूरमियाँ चौकात खून
औरंगाबाद : हॉटेलमध्ये चहा पीत बसलेल्या एका ३७ वर्षीय युवकाच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. शेख सुभान शेख आमिर (३७, रा. शम्सनगर, शाहनूरवाडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
शाहनूरवाडीतील रमजानी टी हाऊसमध्ये शेख सुभान हे आपल्या मित्रासह चहा पीत बसले होते. रात्री १०.३० ते १०.४५ वाजेच्या दरम्यान आरोपी शेख नईम शेख सलीम (३५) हा शेख अलीम, शेख समीर या दोन्ही भावांसह गुपचूप तेथे आला व अचानक शेख सुभानच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घातले. या हल्ल्यात सुभान काही क्षणातच जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला वाचविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्यांच्या मागेही नईम कुऱ्हाड घेऊन लागला. त्यामुळे मित्रही तेथून जीव वाचवून पळून गेले. अखेर अब्दुल सत्तार व त्याच्या अन्य मित्राने जखमी सुभानला खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. परिसरात खुनाची वार्ता पसरली आणि बघ्यांची गर्दी उसळली होती. उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप तारे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन आरोपी शेख नईम यास ताब्यात घेतले.
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले
शेख सुभान याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून जीवे मारण्याची घटना परिसरातील खाजगी सीसीटीव्हीत कैद झाली असून, ते फुटेज पोलीस हस्तगत करीत आहेत.
तुने माँ की कसम पुरी कर दी
सुभानवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून आरोपी शेख नईमचा भाऊ म्हणाला, ‘आरे भाई चल, तुने माँ की कसम पुरी कर दी’, व ते घटनास्थळावरून पसार झाले. किरकोळ भांडणातून उद्भवलेल्या प्रकारात खून करण्याचा प्रकार समोर आला आहे. हे दोन्ही कुटुंबे समोरासमोर राहतात. कुटुंबात होणाऱ्या किरकोळ भांडणावरून ऐकमेकांवर अदखलपात्र गुन्हेदेखील दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक तारे यांनी सांगितले. शेख शकील शेख आमिर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुभानच्या खूनप्रकरणी शेख नईम शेख सलीम, शेख अलीम, शेख सलीम व त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उस्मानपुरा पोलीस करीत आहेत.
महिनाभरापूर्वी झाला होता वाद
मृत शेख सुभानला तीन मुली आणि दोन मुले आहेत. सुभान आणि शेख परिवार हे समोरासमोरच राहतात. महिनाभरापूर्वी लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून दोन्ही परिवारात जोरदार वाद झाला होता. हा वाद पोलिसांतही गेला होता; परंतु समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी मध्यस्थी करीत प्रकरण मिटवले होते. मात्र, शेख नईम ऊर्फ गोरू याच्या मनात शेख सुभान याच्यासोबत झालेल्या भांडणाचा राग होता. त्या रागातूनच ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.