"तू माझ्याशी बोल, अन्यथा तोंडावर अॅसिड फेकेन", अल्पवयीन विद्यार्थिनीला तरुणाची धमकी
By प्रशांत माने | Published: July 22, 2024 04:37 PM2024-07-22T16:37:55+5:302024-07-22T16:38:16+5:30
याप्रकरणी पिडीताने मानपाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नितेश गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
डोंबिवली : तु कुठे जातेस, कोणाशी बोलतेस, माझ्याशी का बोलत नाही, माझ्याशी संपर्क ठेवला नाही तर मी तुझ्या तोंडावर अॅसिड फेकेन, मग महाविद्यालयातील शिक्षण कसे पूर्ण करते ते पाहतोच अशी धमकी अल्पवयीन विद्यार्थीनीला २८ वर्षीय तरूणाने दिल्याचा प्रकार शनिवारी घडला.
याप्रकरणी पिडीताने मानपाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नितेश गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलगी पेंढरकर महाविद्यालयात शिक्षण घेते. शनिवारी सकाळी दहा वाजता ती एमआयडीसीतील विको नाका येथे बसने उतरली. तेथून ती पायी पेंढरकर महाविद्यालयाकडे चालली होती. त्यावेळी नितेश हा स्वत: रिक्षा चालवित तिच्या पाठिमागे आला. त्याने जबरदस्तीने तिला रिक्षात बसण्यास भाग पाडले.
सुसाट वेगाने रिक्षा आर आर रूग्णालयाच्या पुढच्या गल्लीतून कावेरी चौकाच्या पुढे नेत तेथील एका झाडाखाली उभी केली. तेथे त्याने तिची मान पकडून बोलत नसल्याबाबत वाद घालत अॅसिड तोंडावर फेकण्याची धमकी दिली. या घडलेल्या प्रकाराने पीडिता घाबरली. तिने घरी गेल्यावर हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. यानंतर कुटुंबियांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नितेश विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.