अल्पवयीन मुलाने आईच्या प्रियकराचा काढला ‘काटा’; चोरीच्या कोयत्याने केला खून
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 10:23 PM2022-06-21T22:23:31+5:302022-06-21T22:24:26+5:30
आईच्या प्रियकराकडून शिवीगाळ व मारहाण होत असल्याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याचा काटा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : आईच्या प्रियकराकडून शिवीगाळ व मारहाण होत असल्याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याचा काटा काढला. त्यासाठी कोयता चोरून आईच्या प्रियकराचा कोयत्याने वार करून निर्घूणपणे खून केला. भोसरी येथे शनिवारी (दि. १८) ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली.
सुनील रानोजी जावळे (वय २३), रोहीत ज्ञानेश्वर सोनवणे (वय १८, दोघेही रा. भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह १७ वर्षीय मुलाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दीपक गोपाळ वाघमारे (वय २९) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दीपक वाघमारे याचे अल्पवयीन मुलाच्या आईसोबत प्रेम संबध होते. दीपक वाघमारे हा दारू पिऊन अल्पवयीन मुलगा व त्याची बहीण यांना शिवीगाळ करून मारहाण करीत असे. त्याचा राग अल्पवयीन मुलाच्या मनात होता. त्यामुळे वाघमारे याचा काढण्याचे अल्पवयीन मुलाने त्याच्या साथीदारांसह नियोजन केले. त्याप्रमाणे अल्पवयीन मुलाने चार महिन्यांपूर्वी नारळ पाणी विकणाऱ्या इसमाचा कोयता चोरी केला. अल्पवयीन मुलाने शुक्रवारी (दि. १७) दीपक वाघमारे याला सांगितले की, त्याचे एका जणाकडे तीन हजार रुपये असून त्याने मला पैसे घेण्यासाठी खडी मशिन, भोसरी येथील मोकळया मैदानात बोलाविले आहे. तुम्ही माझ्यासोबत चला, असे सांगून तो दीपक वाघमारे यांना मैदानात घेऊन गेला. तेथे वाघमारे याच्यावर कोयत्याने वार केले. तसेच त्याच्या साथीदारांनी दगडाने मारून वाघमारे यांचा खून केला.
खूनप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा समांतर तपास दरोडा विरोधी पथकाचे पोलीस करीत होते. घटनास्थळावर मयताचे आधारकार्ड प्राप्त झाले. त्यावरून मयताची ओळख पटविली. त्याचे काही महिन्यांपूर्वी एका इसमाशी भांडण झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता तो इसम अल्पवयीन १७ वर्षीय मुलगा असल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेतले असता साथीदारांच्या मदतीने त्याने वाघमारे याचा खून केल्याचे कबूल केले.
दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर कैलासे, पोलीस कर्मचारी विक्रांत गायकवाड, सागर शेडगे, गणेश हिंगे, सुमीत देवकर, गणेश सावंत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.