वडगाव मावळ परिसरात पूर्व वैमनस्यातून तरुण उद्योजकाचा निर्घृण खून, पाच तासांत आरोपी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 02:28 PM2020-05-23T14:28:45+5:302020-05-23T14:29:15+5:30
तीन मोटारसायकलवरून आलेल्या सात ते आठ जणांनी कोयत्याने यश यांच्या डोक्यावर, हातावर वार केले.
वडगाव मावळ : पूर्व वैमनस्यातून टाकवे बुद्रुक येथे शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास एका तरुण उद्योजकाचा निर्घृण खून करण्यात आला. आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता.यश रोहीदास असवले वय २२ रा. टाकवे बुद्रुक असे खूण झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी रूतीक बाळू असवले (वय २०) अजय बबन जाधव (वय २४ ) दोघेही रा.टाकवे, अतिष राजु लंके (वय २१) रा.वनननगर तळेगाव दाभाडे, विकास उर्फ बापू विष्णू रिठे (वय २३) रा.गुरूदत्त कॉलनी वराळेरोड तळेगाव, रूतीक कांताराम चव्हाण (वय १९),रा.म्हाळसकर वाडा वडगाव मावळ, अश्विन कैलास चोरघे ( वय २२) रा.घोणशेत रोड मावळ, निखील भाऊ काजळे (वय २०) रा.वडगाव मावळ अशी अटक केलेल्यांची नावे असून त्याच्या कडील तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या.
वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोणशेत टाकवे रस्त्यावर तीन मित्रांबरोबर रोजच्या प्रमाणे संध्याकाळी फिरायला गेला होता. रात्री दहाच्या सुमारास टाकवे बाजुकडून तीन मोटारसायकलवरून आलेल्या सात ते आठ जणांनी कोयत्याने डोक्यावर, हातावर वार केले. यश रक्ताच्या थारोळ्यात पडल्या नंतर हल्लेखोर पळून गेले. गंभीररित्या जखमी झालेल्या यशला तातडीने सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
वडगाव पोलिसांनी सात आरोपींना अटक करून पाच तासांत गुन्हा उघकीस आणला. खून केल्यानंतर आरोपी वडगाव येथील डेक्कन हिल्सजवळ पाण्याच्या टाकीजवळ लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिस अधिक्षक संदिप पाटील, अप्पर अधिक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप देसाई, शिला खोत, विश्वास आंबेकर, राजेंद्र पवार ,कविराज पाटोळे,भाऊसाहेब कर्डिले, गणेश तावरे,मनोज कदम, शैल कंटोळी, रविंद्र राय, दिलीप सुपे, दीपक गायकवाड, प्रविण विरणक, यांनी रात्रभर फिरून आरोपींना सापळा रचून अटक केली.