इंजिनिअर तरूणीची हत्या, प्रियकर गंभीर; ब्रेकअपसाठीची भेट ठरली अखेरची
By प्रदीप भाकरे | Published: May 10, 2023 12:53 PM2023-05-10T12:53:44+5:302023-05-10T12:54:18+5:30
बडनेरातील घटना, दोघांच्या गळ्यावर खोलवर जखमा
प्रदीप भाकरे/ श्यामकांत सहस्त्रभोजने
बडनेरा (अमरावती) : लगतच्या सुपर एक्सप्रेस हायवेलगत एका कॉलेजकन्येचा मृतदेह आढळून आला. तर तिच्याशेजारी एक तरूण गंभीर जखमी स्थितीत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघड झाली असून, बडनेरा पोलिसांनी तुर्तास सखोल चौकशी चालविली आहे. पोलिसांच्या मते ती घटना एकतर्फी प्रेमातून घडली असावी, मात्र, जखमी तरूणाने कुणीतरी आपल्यासह आपल्या प्रेयसीवर हल्ला केल्याचे बयान दिले आहे. त्यामुळे पोलीस सध्या कुठल्याही निष्कर्षाप्रत पोहोचलेली नाही.
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील, एसीपी दत्तात्रय ढोले यांच्यासह बडनेराचे ठाणेदार नितीन मगर हे घटनास्थळी पोहोचले असून, तेथून दोघांचेही मोबाईलव मुलाची दुचाकी जप्त करण्यात आले. तर गंभीर जखमी तरूणाला जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलीस सुत्रानुसार, संजना शरद वानखडे (कांडली, परतवाडा) असे मृत तरूणीचे नाव आहे. तर जखमी तरूणाचे नाव सोहम गणेश ढाले (रा. तुळजापूर गांधी, ता. चांदूरबाजार) असे असल्याचे समोर आले आहे. दोघेही न्यु राम मेघे अभियांत्रिकी कॉलेजमध्ये आयटी फस्ट इअरचे विदयार्थी आहेत. दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होते, अशी माहिती त्या दोघांच्या क्लासमेटनी पोलिसांनी दिली आहे.
बडनेरा पोलिसांना आला सहाला कॉल
एक युवक, युवती गंभीर अवस्थेत वडुरा गावालगत पडले असल्याची माहिती पहाटे सहाच्या सुमारास बडनेरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले असता, तरूणीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. तर जखमी तरूण पाणी व ॲम्बुलन्स बोलावा, अशी आर्जव करताना मरणासन्न आढळून आला. दोघांच्याही गळ्यावर, मानेवर धारदार शस्त्राचे घाव आहेत. दोघेही साईनगर परिसरात भाड्याने राहत होते, अशी माहिती समोर आली आहे.
बयानात म्हणाला, आम्ही ब्रेकअपसाठी भेटलो
दरम्यान, जखमी तरूणाचे प्राथमिक बयान नोंदविले गेले असून आपण आज पहाटे ब्रेकअपसाठी शेवटचे भेटायचे ठरविले होते, त्यानुसार आपण न्यु एक्सप्रेस हायवेवर पोहोचलो. तेथे बोलत असताना दोन अज्ञातांनी आमच्यावर हल्ला केला, एकाचवेळी हल्ला केल्याने आपण प्रतिकार करू शकलो नाही, असे त्याने बयानात म्हटले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.