गुंगीकारक औषधांच्या साठ्यासह तरुण गजाआड; ५ हजारांचा मुद्देमाल जप्त
By देवेंद्र पाठक | Published: March 27, 2023 06:06 PM2023-03-27T18:06:52+5:302023-03-27T18:12:30+5:30
आझादनगर पोलिसांची कारवाई, ५ हजारांचा मुद्देमाल जप्त
धुळे : नशा येण्यासाठी विनापरवाना गुंगीकारक औषधांची विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका तरुणाला आझादनगर पोलिसांनी सापळा लावून पकडले. ही कारवाई नटराज टॉकीज परिसरात करण्यात आली असून त्याच्याकडून ४ हजार ८८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फैजान ऊर्फ ईन्या अहमद मुझम्मिल अन्सारी (वय १९, रा. चांदतारा चौक, मौलगीगंज, धुळे) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
शहरातील नटराज टॉकीज ते निळा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बखळ जागेत काटेरी झुडूपात एकजण गुंगीकारक औषधांचा साठा बाळगून विनापरवाना त्याची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत आहे, अशी गोपनीय माहिती आझादनगर पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच आझादनगर पोलिसांच्या पथकाने सापळा लावला. फैजान ऊर्फ ईन्या अहमद मुझम्मिल अन्सारी याला पकडण्यात आले. त्याच्याकडे एका कापडी पिशवीत ४ हजार ८८५ रुपये किमतीच्या ४० विनापरवाना गुंगी आणणाऱ्या औषधांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. तरुणाविरोधात एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ८ (क), २२ सह भादंवि कलम ३२८, २७६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक एस. हृषिकेश रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलिस निरीक्षक प्रमाेद पाटील व त्यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक दीपक पावरा, कर्मचारी योगेश शिरसाठ, प्रकाश माळी, राजू देसले, संदिप कढरे, चंद्रकांत पाटील, योगेश शिंदे, अनिता आखाडे, आतिक शेख, सुशील शेंडे, अजहर शेख, शोऐब बेग, सिद्धांत मोरे, संतोष घुगे, प्रमाेद खैरनार यांनी ही कारवाई केली.