तरुणीचा पाठलाग करणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:36 AM2019-12-18T00:36:30+5:302019-12-18T00:36:36+5:30
अश्लील फोटो व्हायरल, सायबर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुंबई : विवाह नोंदणी संकेतस्थळावरून रेडिओ जॉकी तरुणीची माहिती मिळवत, पुढे लग्नासाठी तिच्यामागे तगादा लावला. तरुणीने नकार देताच तिचा पाठलाग करून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आंध्र प्रदेशच्या आरोपीला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
विजय अलेक्झांडर असे आरोपीचे नाव आहे. तो मध्य प्रदेशमध्ये चालक म्हणून काम करतो. ६ नोव्हेंबर रोजी रेडीओ जॉकी तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. तिच्या तक्रारीनुसार, विवाह नोंदणी संकेतस्थळावरून ती विजयच्या संपर्कात आली. विजयने तिचा विश्वास संपादन केला. पुढे तिच्या बँकेचा तपशील मिळविण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे तरुणीला संशय आला. तिने त्याच्याशी बोलणे टाळले. त्याचा मोबाइल क्रमांकही ब्लॉक केला. त्यानंतर विजयने अन्य अॅपवरून संदेश धाडण्यास सुरुवात केली. तसेच तरुणीच्या सोशल मीडियावरील फोटोंना मॉर्फ करून ते प्रसारित करण्याची धमकीही तो देऊ लागला. तसेच तरुणीचे काही फोटोही त्याने सोशल मीडियावर प्रसारित केल्याने तरुणीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
तपासात आंध्र प्रदेश कनेक्शन समोर येताच तपास पथक आंध्र प्रदेशच्या विजयवाडा परिसरात रवाना झाले. तेथून त्यांनी विजयला ताब्यात घेतले. विजय हा विवाह नोंदणी संकेतस्थळावरून महिलांशी ओळख करत असे. पुढे याच ओळखीतून महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना जाळ्यात ओढायचा. पुढे त्यांचे फोटो मिळवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळत असल्याचे तपासात समोर आले आहे.
स्वत:ची माहिती गोपनीय ठेवा...
अशा प्रकारच्या फसवणुकीला थांबविण्यासाठी महिलांनी सोशल मीडियावर स्वत:ची माहिती गोपनीय ठेवण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच बँक खात्यांचा तपशीलही कुणाला शेअर करू नये, असेही त्यांच्याकडून नमूद करण्यात आले.