‘त्या’ तरुणीची आत्महत्या सोशल मीडियावरील आभासी एकतर्फी प्रेमातून, परभणीच्या तरुणाविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 05:23 AM2021-04-02T05:23:13+5:302021-04-02T05:23:19+5:30
तो परभणीत तर ती औरंगाबादेत राहते. फेसबुकवर त्यांची मैत्री झाली. त्यांच्यात बोलणे सुरू झाले. सात ते आठ महिन्याच्या कालावधीतील संवादाला ती प्रेम समजत होती.
औरंगाबाद : तो परभणीत तर ती औरंगाबादेत राहते. फेसबुकवर त्यांची मैत्री झाली. त्यांच्यात बोलणे सुरू झाले. सात ते आठ महिन्याच्या कालावधीतील संवादाला ती प्रेम समजत होती. यातून तिने त्याला लग्न करणार का विचारले, त्याने आपली केवळ मैत्री आहे, असे सांगून तिला स्पष्ट नकार दिला. प्रेमात अपयश आल्यामुळे तिने १३ जानेवारी रोजी गळफास घेतला. नुकतीच तिची सुसाईड नोट नातेवाईकांना सापडली. या चिठ्ठीच्या आधारे जवाहरनगर पोलिसांनी त्या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला. (‘That’ young girl commits suicide out of virtual one-sided love on social media, a FIR against Parbhani’s young man)
आकाश रामराव गायकवाड (२५, रा. गांधीनगर, परभणी) असे गुन्हा नोंद झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो परभणीत मजुरी करतो. सुमारे सात ते आठ महिन्यांपूर्वी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर या दोघांची मैत्री झाली होती. त्यातूनच तरुणीने आकाशकडे लग्नासाठी विचारणा केली होती. मात्र, आकाशने स्पष्ट नकार दिला होता.
दरम्यान, तिच्या आईवडिलांना घरात नुकतीच सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीत तिने तिच्या आत्महत्येला आकाश जबाबदार असल्याचे नमूद केले.