दलित हत्याकांडप्रकरणी तरुणाला केली अटक, गुन्ह्याचे धक्कादायक कारण आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 09:50 AM2021-12-01T09:50:17+5:302021-12-01T09:50:39+5:30
Crime News: प्रयागराजमधील दलित हत्याकांडात पोलिसांनी तीन दलित तरुणांना पकडले आहे. यातील एकाला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा दावाही पोलीस करत आहेत.
लखनौ - प्रयागराजमधील दलित हत्याकांडात पोलिसांनी तीन दलित तरुणांना पकडले आहे. यातील एकाला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा दावाही पोलीस करत आहेत. अन्य दोन दलित तरुणांची लवकरच सुटका करण्यात येईल. गत आठवड्यात दलित कुटुंबातील चौघांची हत्या झाली होती. त्यानंतर ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी ८ सवर्णांना अटक केली होती. प्रयागराजचे एडीजी प्रेम प्रकाश यांनी दावा केला की, संशयित तरुण १९ वर्षीय तरुण मुलीचा पाठलाग करत होता. नंतर बलात्कार करून तिचा खून केला. आता फॉरेन्सिक आणि डीएनए रिपोर्टची प्रतीक्षा करण्यात येत आहे. तर पीडित कुटुंबीयांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे की, पोलीस सवर्णांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
जुन्या प्रकरणात चौघे तुरुंगात
दलित हत्याकांड प्रकरणातील ११ आरोपींपैकी चार जणांना एका जुन्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मृत फुलचंदचे भाऊ यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये आकाश सिंह, अभय सिंह, मनीष सिंह आणि रवि सिंह यांच्याविरुद्ध मारहाण, शिवीगाळ केल्याची ॲट्राॅसिटीची तक्रार केली होती. या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल. आरोपी पवन सरोजच्या फरार साथीदारांचा शोध सुरू आहे. त्यांना शोधण्यासाठी पोलीस पुणे, लखनौला गेले आहेत.