परस्त्रीशी संबंध का ठेवतो?, असा जाब विचारणाऱ्या शेजाऱ्यावर युवकाने केला विळ्याने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 20:02 IST2021-03-25T20:01:14+5:302021-03-25T20:02:04+5:30
Murder Case : नाकापार्डी येथे विळ्याचे घाव घालून खून

परस्त्रीशी संबंध का ठेवतो?, असा जाब विचारणाऱ्या शेजाऱ्यावर युवकाने केला विळ्याने हल्ला
यवतमाळ : तालुक्यातील नाकापार्डी येथे विवाहित असतानाही परस्त्रीशी संबंध का ठेवतो असा जाब विचारणाऱ्या शेजाऱ्यावर युवकाने विळ्याने हल्ला केला. ही घटना २१ मार्चच्या रात्री घडली. यातील जखमी सचिन पांडुरंग सोनवने याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.
सचिन सोनवने याच्या शेजारी संतोष सोमाजी येसनसुरे (३०) हा राहतो. तो विवाहित असूनही त्याचे परस्त्रीशी संबंध होते. हा प्रकार सचिनला आवडत नव्हता. त्याने संतोषची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे चिडलेल्या संतोषने सचिनवर धारदार विळ्याने हल्ला केला. यात सचिन गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी सचिनचा भाऊ नितीन सोनवने याच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी भादंवि ३२६, ५०४ चा गुन्हा दाखल केला. मात्र गुरुवारी सचिनचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात संतोष येसनुसरे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. चांगला सल्ला देणे सचिनच्या जीवावर बेतला.