पुण्यातील वाघोलीमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 10:17 PM2020-09-01T22:17:57+5:302020-09-01T22:18:18+5:30
गणेश विसर्जन करतान खाणीत तरुण बुडाला. पोहता येत असूनही तो कसा बुडाला हे समजू शकले नाही.
पुणे : पुण्यातील गणेश विसर्जनासाठी वाघोली येथील खाणीत गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यु झाला.
कृष्णा मारुती लोकरे (वय १८, रा. जाधव वस्ती, वाघोली) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत अग्निशामक दलाने सांगितल्यानुसार, लोकरे कुटुंब गणेश विसर्जनासाठी टेम्पो घेऊन जाधव वस्तीतील भावडी रोडवर असलेल्या दगडाच्या खाणीत गेले होते. कृष्णाला पोहता येत होते. कृष्णा व त्याचा मित्र पाण्यात उतरले. कृष्णाचे आईवडिल वरतीच थांबले होते. दोघेही गणपतीची मूर्ती घेऊन कमरेइतक्या पाण्यात गेले. त्याचवेळी अचानक कृष्णा पाण्यात बुडाला. अग्निशामक दलाला दुपारी १ वाजून ३७ मिनिटांनी याची वर्दी मिळाली.
येरवडा अग्निशामक दलाची गाडी तातडीने घटनास्थळी रवाना झाली. अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव, कर्मचारी सुनील देवकर, धुमाळ, पोटे यांनी तरुणाचा मृतदेह खाणीतून बाहेर काढला. कर्मचार्यांनी मृतदेह नातेवाईकांच्या हवाली केला.
कृष्णाचे वडील एका इमारतीवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. कृष्णाला पोहता येत असूनही तो कसा बुडाला हे समजू शकले नाही.