कबूतराच्या वादातून तरुणाने चाकूने सपासप वार करून केली तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 08:29 PM2021-03-28T20:29:34+5:302021-03-28T20:31:35+5:30
Murder Case : मृतक बागडे आणि आरोपी शेख हे गिट्टीखदान मधील गवळीपूऱ्यात शेजारीच राहत होते. ते दोघेही कबूतर पाळत.
नागपूर : गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत कबूतरबाजीतून निर्माण झालेल्या वादानंतर एकाने दुसऱ्यावर चाकूचे घाव घालून त्याची हत्या केली. अक्षय सिद्धार्थ बागडे (वय २५) असे मृताचे नाव असून राजा उर्फ अरमान उर्फ अजहर जाफर शेख (वय २७) असे आरोपीचे नाव आहे.
मृतक बागडे आणि आरोपी शेख हे गिट्टीखदान मधील गवळीपूऱ्यात शेजारीच राहत होते. ते दोघेही कबूतर पाळत. शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास या दोघांमध्ये कबूतर उडविण्याच्या कारणावरून वाद झाला. शिवीगाळ आणि हाणामारीनंतर आरोपी राजा उर्फ अरमान शेखने अक्षय बागडेवर शस्त्राचे घाव घातले. त्याच्या छातीवर वार बसल्यामुळे तो गतप्राण झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. माहिती कळताच गिट्टीखदान पोलीस तिकडे धावले. त्यांनी तेथील परिस्थिती निवळल्यानंतर मृत बागडेची बहिण रोशनी रॉबिन साळवे (वय ३१) हिच्या तक्रारीवरून आरोपी राजा उर्फ अरमान शेख विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.
आरोपीला सक्करदऱ्यात पकडले
हत्या केल्यानंतर आरोपी पळून गेला. एपीआय दत्ता पेंडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रभर शोधाशोध केल्यानंतर आरोपी ताजबाग, सक्करदरा मध्ये दडून बसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे पोलिसांचे पथक तिकडे पोहोचले. त्यांनी आज दुपारी १२च्या सुमारास आरोपी शेखच्या मुसक्या बांधल्या.