नशेच्या गोळ्यासाठी पैसे न दिल्याने तरूणाचा चाकूने भोसकून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 05:01 PM2019-09-25T17:01:47+5:302019-09-25T17:04:17+5:30
नऊ दिवसात शहरातील खूनाची ही तिसरी घटना आहे.
औरंगाबाद: नशेच्या गोळ्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून तिघांनी एकाचा धारदार चाकूने भोसकून खून केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री पडेगावातील कासंबरी दर्गा परिसरात घडली. याविषयी छावणी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून गुन्हेशाखेने मुख्य आरोपीला तर छावणी पोलिसांनी अन्य दोन जणांना बुधवारी दुपारी ताब्यात घेतले. नऊ दिवसात शहरातील खूनाची ही तिसरी घटना आहे.
सय्यद जमीर सय्यद जहीर (२५,रा. कासंबरी दर्गा परिसर, पडेगाव)असे मृताचे नाव आहे. तर मुख्य आरोपी सय्यद शाकेर अली सय्यद नासेर अली(२५,रा.कासंबरी दर्गा परिसर),शेख दाऊद उर्फ शहारूख नजमोद्दीन आणि सय्यद शहजाद अली सय्यद नासेर अली अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी छावणी पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि मृत हे एकाच कॉलनीतील रहिवासी आहेत. आरोपी सय्यद शाकेर हा सातवी शिकलेला आहे, मात्र तो इलेक्ट्रीकलची कामे करतो. त्याचा भाऊ सय्यद शहजाद अली आणि मृत जमीर हे परस्परांचे मित्र होते. जमीर आणि शहजाद यांच्यात भांडण झाले होते. त्यावेळी मृताने शहजादला मारहाण केली होती. ही बाब शहजादने त्याचा मोठा भाऊ सय्यद शाकेरला सांगितली होती.
मंगळवारी रात्री बारा ते साडेबारा वाजेदरम्यान सय्यद जमीर हा कासंबरी दर्गा परिसरातून घरी जात असताना गट नंबर ८६ मधील हॉटेल सवेरासमोरील रिकामा भूखंड क्रमांक १८/१९ येथे आरोपींनी जमीरला गाठले आणि त्याच्याकडे नशेच्या गोळ्या खरेदी करण्यासाठी सय्यद शाकेरने पैशाची मागणी केली. जमीरने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यास शिवीगाळ करून त्याच्यासोबत भांडण सुरू केले. यावेळी आरोपी सय्यद शहजाद आणि शेख दाऊद यांनी त्याला पकडले तर आरोपी सय्यद शाकेरने त्याच्या पाठीवर, पोटात आणि मांडीवर चाकूने भोसकले. या घटनेत गंभीर जखमी होऊन जमीर खाली कोसळला. यांनतर आरोपी सय्यद शाकेर हा तेथून पसार झाला.
या घटनेत आपल्यावंर बालंट येऊ नये, याकरीता आरोपी दाऊद उर्फ शहारूख याने गंभीर जखमी सय्यद जमीरला रिक्षातून घाटीत दाखल केले.तेथे उपचारादरम्यान पहाटे ४.१०वाजता सय्यद जमीरचा मृत्यू झाला. याघटनेप्रकरणी मृताचा भाऊ सय्यद जुने यांनी दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलिसांनी आरोपींविरोधात खूनाचा गुन्हा नोंदविला.