नागपुरात वर्चस्वाच्या लढाईतून युवकाचा खून : दोन महिन्यानंतर पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:11 AM2020-02-04T00:11:19+5:302020-02-04T00:12:44+5:30
पारडीतील कुख्यात गुंड अक्षय येवलेने वर्चस्वाच्या लढाईतून सुरू असलेल्या गँगवॅरमध्ये साथीदारांच्या मदतीने प्रतिस्पर्ध्याच्या मित्राचा खून केला. खुनानंतर मृतदेहाला आग लावून सापळा जामठाच्या नाल्यात फेकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पारडीतील कुख्यात गुंड अक्षय येवलेने वर्चस्वाच्या लढाईतून सुरू असलेल्या गँगवॅरमध्ये साथीदारांच्या मदतीने प्रतिस्पर्ध्याच्या मित्राचा खून केला. खुनानंतर मृतदेहाला आग लावून सापळा जामठाच्या नाल्यात फेकला. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेचा गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश करून तीन आरोपींना अटक केली आहे.
मोनेश भागवत ठाकरे (२५) हे मृताचे नाव आहे. तर आरोपीत अक्षय गजानन येवले (२५), नीलेश दयानंद आगरे (१९), अमोल ऊर्फ विक्की श्रीचंद हिरापुरे (२५) यांचा समावेश आहे. सर्वजण पारडीच्या भवानीनगरात राहतात. आरोपींचा सोहम बीरसिंह बिलोरीया नावाचा साथीदार फरार आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त नीलेश भरणे, निरीक्षक विनोद पाटील यांनी याबाबत माहिती दिली. अक्षय येवले पारडीतील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची पारडीत दहशत आहे. त्याचा मोनेशचा मित्र विनोद वाघ सोबत वाद सुरू होता. अक्षयला खुनाच्या प्रयत्नानंतर अटक करून तुरुंगात पाठविण्यात आले होते. दरम्यान, विनोद वाघने अक्षयचा मित्र नीलेश आगरेशी मारपीट केली. नीलेशने तुरुंगात भेटीदरम्यान अक्षयला विनोदने मारहाण केल्याचे सांगितले. अक्षयने काही दिवस शांत राहण्याचा सल्ला देऊन तुरुंगातून आल्यानंतर विनोदला पाहून घेऊ असे सांगितले. जमानतीवर आल्यावर अक्षयला विनोद आणि त्याचे साथीदार खुनाच्या प्रयत्नात असल्याचे समजले. त्यामुळे ते विनोदच्या खुनाची संधी शोधत होते. २७ नोव्हेंबरला रात्री आरोपींना विनोदचा मित्र मोनेश पारडीच्या काजल बारमध्ये दारू पिताना आढळला. मोनेशने अक्षयला माझ्याजवळ सोन्याचे नाणे आहेत. ते एका प्लॉटवर लपवून ठेवले असून तेथे गेल्यावर दाखवितो असे सांगितले. त्यामुळे अक्षयला मोनेश त्याच्या खुनाच्या प्रयत्नात असल्याची शंका आली. त्याने मोनेशसोबत जाऊन त्याचा खून करण्याचे ठरविले. तो नीलेशलाही आपल्या सोबत घेऊन गेला. अक्षय आणि नीलेश मोनेशला आपल्या घराजवळ घेऊन आले. नशेत असल्यामुळे मोनेशला त्यांच्यावर शंका आली नाही. तेथे ते मोनेशला एका बेवारस घरात घेऊन गेले. पोट आणि छातीवर चाकूने वार करून त्याचा खून केला. मृतदेह तेथून हटविण्यासाठी त्यांनी सोहम बिलोरीयाला पेट्रोल घेऊन येण्यास सांगितले.
त्यांनी मृतदेह पारडीच्या निर्जनस्थळी नेऊन पेट्रोल टाकून जाळला. त्यानंतर घरी येऊन त्यांनी आपले कपडे धुतले. दुसऱ्या दिवशी ते कारने मृतदेहाजवळ गेले. त्यांना मृतदेहाच्या सापळ्याचे काही अवशेष दिसले. त्यांनी एका साडीत हे अवशेष बांधून जामठाच्या नाल्यात फेकले. दरम्यान, मोनेशचे वडील भागवत ठाकरे यांनी पारडी ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांना २७ नोव्हेंबरला रात्री मोनेश अखेरच्या वेळी अक्षय आणि त्याच्या साथीदारांसोबत काजल बारमध्ये असल्याची माहिती मिळाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोनेश अक्षयसोबत जाताना दिसला. पोलिसांच्या चौकशीतही अक्षयने काहीच माहिती दिली नाही. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज,अक्षयची गुन्हेगारी वृत्ती यामुळे त्यानेच हा खून केल्याची त्यांची खात्री झाली. पोलिसांनी सक्ती केल्यावरही तो खुनाचा इन्कार करीत होता. पोलिसांनी नीलेशला ताब्यात घेतले असता त्याने अक्षयनेच खून केल्याचे सांगितले. मोनेश कारपेंटरचे काम करीत होता. त्याची कोणतीच गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. ही कारवाई अप्पर आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनोद पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, उपनिरीक्षक ओमप्रकाश भलावी, श्रीनिवास मिश्रा, सुनील चौधरी, रवींद्र राऊत आदींनी केली.
राजकीय मतभेदही वैमनस्याचे कारण
अक्षयच्या मते, विनोद आणि मोनेश त्याच्या खुनाच्या प्रयत्नात होते. त्यापूर्वीच त्याने त्याचा खून केला. त्याच्या बोलण्यावर कोणाचाच विश्वास नाही. त्याने प्रतिस्पर्ध्याना धडा शिकविण्यासाठी आणि पारडीत आपले वर्चस्व तयार करण्यासाठी मोनेशचा खून केला. त्याची पारडीत दहशत आहे. त्यामुळेच चौकशीत कोणीच त्याच्यावरुद्ध माहिती दिली नाही. खुनाचे कारण पारडीत सुरूअसलेली राजकीय लढाई असल्याची माहिती आहे. अक्षयने प्रतिस्पर्ध्याची वाढती ताकद पाहून मोनेशचा खून केला. अक्षय आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध मकोकानुसार कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पोलिसांचे अपयशही उघड
या प्रकरणात पोलिसांचे अपयश उघड झाले आहे. पोलिसांना सुरुवातीलाच मोनेश अक्षयसोबत दुचाकीवर गेल्याचे समजले. अक्षयची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि बदला घेण्याची प्रवृत्ती असल्याची माहिती असूनही ते खरी घटना पुढे आणू शकले नाहीत. पारडी आणि गुन्हे शाखा पोलिसांनी अनेकदा त्याची चौकशी केली. तो पोलिसांची दिशाभूल करीत होता. अप्पर आयुक्त नीलेश भरणे यांनी मिसिंंगची तक्रार गंभीरतेने घेण्याचा भरवसा दिला. त्यांनी तपास पथकाला ५० हजारांचे पारितोषिक देण्याची घोषणा केली.