रस्त्याशेजारी उभ्या असणाऱ्या युवक-युवतीचा मोबाईल चाकूचा धाक दाखवून हिसकावला
By देवेंद्र पाठक | Published: April 6, 2023 04:44 PM2023-04-06T16:44:28+5:302023-04-06T16:45:59+5:30
दोन मोबाईलची किंमत १२ हजार रुपये इतकी आहे. त्या दोघांचा पाठलाग केला पण त्याचा काही उपयाेग झाला नाही.
धुळे : रस्त्याच्या कडेला मैत्रिणीसोबत बोलत असणाऱ्या तरुणाला चाकूचा धाक दाखवत तरुणासह त्याच्या मैत्रिणीचा असे दोन मोबाईल हिसकावून दोन अनोळखी तरुणांनी पोबारा केला. ही घटना मोराणे ते गोंदूर बायपासवरील सपना पोल्ट्री फॉर्मजवळ मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.साक्री रोडवरील विद्याविहार कॉलनीत राहणारा चारुदत्त अनिल जोशी (वय २२, मूळ रा. परळी, जि. बीड) याने पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यानुसार धुळ्यानजीक मोराणे गोंदूर नगाव हा बायपास जातो. मोराणे ते गोंदूर दरम्यान निकम पाॅलिटेक्निकच्या पुढे सपना पोल्ट्री फॉर्मच्या बोर्डाजवळ चारुदत्त जोशी हा तरुण त्याच्या मैत्रिणीसाेबत बोलत उभा होता. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्या मार्गावरुन कोणीही ये-जा करत नसल्याची संधी साधून दोन अनोळखी तरुण तिथे आले. त्यांनी या दोघांना घेरले. चाकूचा धाक दाखवत दमदाटी करीत शिवीगाळ केली आणि तरुणासह त्याच्या मैत्रिणीचा मोबाईल हिसकावून पोबारा केला. दोन मोबाईलची किंमत १२ हजार रुपये इतकी आहे. त्या दोघांचा पाठलाग केला पण त्याचा काही उपयाेग झाला नाही. सर्वत्र शोध घेऊनही त्याचा उपयोग झाला नाही. याप्रकरणी बुधवारी रात्री पावणे आठ वाजता पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक एम. एच. सैय्यद करीत आहेत.