प्रेमभंग झाल्याने आत्महत्या करण्यासाठी गेला तरुण; तब्बल २०० पायऱ्या चढून पोलिसांनी वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 07:31 PM2021-09-05T19:31:18+5:302021-09-05T20:15:22+5:30
Suicide Attempt :मुंबईतील २७ वर्षीय व्यावसायिक तरुणाचे वसईत राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र, टाळेबंदीमुळे त्यांच्या लग्नाला उशीर लागत होता.
नालासोपारा : प्रेमभंग झाल्याने आत्महत्या करण्यासाठी वालीव येथील एका टेकडीवर गेलेल्या तरुणाला दोन पोलिसांनी तब्बल २०० पायऱ्या चढून वाचवले. पोलिसांनी मोबाईलवर बोलण्यात व्यस्त ठेवून नंतर त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून घरच्यांच्या ताब्यात दिले आहे.
मुंबईतील २७ वर्षीय व्यावसायिक तरुणाचे वसईत राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र, टाळेबंदीमुळे त्यांच्या लग्नाला उशीर लागत होता. दरम्यान, त्याच्या प्रेयसीने दुसरे लग्न केले. यामुळे हा तरुण निराश झाला आणि शनिवारी सकाळी आत्महत्या करण्यासाठी वसई पूर्वेच्या भागवत टेकडीवर गेला. ही माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त जयकुमार यांना मिळताच सकाळी सव्वाअकरा वाजता वालीव पोलिसांना कळवले. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील बालाजी गायकवाड आणि सचिन बळीद यांनी लगेच त्या ठिकाणी धाव घेतली. हा तरुण ज्या टेकडीवर होता ती टेकडी अडीच हजार फूट उंचीवर होती. बळीद आणि गायकवाड यांनी त्याला फोनवर बोलण्यात गुंगवून ठेवले आणि त्याला आत्महत्या करण्यपासून रोखले. पोलिसांना पोहोचण्यात पाच मिनिटे जरी उशीर झाला असता तरी त्याने खाली उडी मारून जीव दिला असता. यावेळी त्याच्याशी बोलत राहणे, धीर देणे गरजेचे होते. आम्ही त्याला बोलण्यात व्यस्त ठेवले, अशी माहिती पोलीस नाईक सचिन बळीदने दिली. हा तरुण व्यावसायिक असून त्याची वसईत कंपनी आहे.
दोन पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून या तरुणाला बोलण्यात व्यस्त ठेवले. सुमारे दोनशे पायऱ्यावर चढून त्या तरुणाला वाचवले. - राहुल पाटील, पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे.