कॉल सेंटरमधून काम आटोपून घरी जाणाऱ्या तरुणास चाकूचा धाक दाखवून लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 04:30 PM2021-12-22T16:30:08+5:302021-12-22T21:30:29+5:30
Crime News : आधी एकाने लाईटर विचारले असता अमृत ने नाही सांगितले. दुसऱ्याने वेळ विचारली असता तो न बोलताच पुढे चालू लागला. त्यावेळी मागून एकजण आला आणि अमृतला पकडून चाकू दाखवून त्याच्या खिशातील २ मोबाईल बळजबरी काढून घेतले .
मीरारोड - कॉल सेंटरमध्ये काम आटोपून घरी जात असलेल्या तरुणास चाकूच्या धाकाने तिघा जणांनी लुटल्याचा गुन्हा काशीमीरा पोलीस ठाण्यात सोमवारी दाखल झाला आहे. जबरी लुटीच्या घटना वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरू लागले आहे.
मीरारोडच्या बेवर्ली पार्क भागात राहणारा अमृत तानावडे (२५) हा कासारवडवली येथील कॉल सेंटर मध्ये कामास आहे. काम आटोपून रविवारच्या मध्यरात्री त्याच्या मित्राने त्याला मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील दिल्ली दरबार हॉटेल येथे सोडले . घरी जाण्यासाठी तो पायी रस्त्याने चालत जात असताना सर्व्हिस मार्गावर तिघे तरुण बसले होते. आधी एकाने लाईटर विचारले असता अमृत ने नाही सांगितले. दुसऱ्याने वेळ विचारली असता तो न बोलताच पुढे चालू लागला. त्यावेळी मागून एकजण आला आणि अमृतला पकडून चाकू दाखवून त्याच्या खिशातील २ मोबाईल बळजबरी काढून घेतले . त्याचे पाकीट काढून घेतले असता अमृतने आतील ओळखपत्रे तरी द्या असे सांगितले असता पाकिटातील ५२० रुपयांची रोकड काढून पाकीट परत केले. तसेच एका मोबाईल मधील सिमकार्ड व मेमरी कार्ड सुद्धा परत करत तिघेही तेथून पसार झाले. या प्रकरणी १४ हजरांचे मोबाईल, रोख जबरी लुटल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. गेल्या आठवड्यात भाईंदर येथे एका रेल्वे पेन्ट्री कमर्चाऱ्यास पहाटे दोघांनी मारहाण करून लुटल्याची घटना घडली होती.