मॉर्निंग वॉकिंगसाठी गेलेल्या तरुणाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 12:59 AM2021-08-13T00:59:12+5:302021-08-13T01:00:04+5:30
Accident : या अपघात प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपास पोलीस करीत आहेत.
वसईच्या सनसिटी रस्त्यावर बुधवारी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास फेरफटका मारायला गेलेल्या तरुणाचा दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मनीष मनोहर कार्की (27) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून तो नुकताच परदेशातुन परतला होता. अपघातानंतर दुचाकी स्वार पळून गेला आहे. ही दुचाकी माजी नगरसेविकेच्या मुलाच्या नावावर असल्याचे सूत्रांकडून कळते आहे. तसेच दुचाकी चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
वसई पश्चिमेला सनसिटी गास हा रस्ता आहे. या रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडे आणि खाडी असल्याने रस्ता सकाळ संध्याकाळी लोक फेरफटका व फिरण्यासाठी येतात. मात्र या परिसरात भरधाव वेगाने वाहने जात असल्याने नेहमी अपघाताच्या घटनाही घडत असतात. बुधवारी संध्याकाळी सनसिटीच्या धुरी कॅम्पसमध्ये राहणारा मनिष कार्की हा तरुण नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या सुमारास या रस्त्यावर वॉक करत होता. रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकी स्वाराने त्याला धडक दिली. मनीष रस्स्यावर फेकला गेला. मात्र दुचाकीस्वार तिथून पळून गेला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मनीषला स्थानिकांनी उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेला मनीष हा तरुण शेफ होता. कोरोनामूळे परदेशात लॉकडाऊन असल्याकारणाने तो परदेशातुन परतला होता. सध्या तो वसईच्या सनसिटी येथे राहत होता.
घटनास्थळी धडक दिलेल्या दुचाकी वाहनाची नंबर प्लेट मिळाली असून हे वाहन नालासोपारा पूर्वेतील एका माजी नगरसेविकाच्या मुलाचा नावाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंद असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघात प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपास पोलीस करीत आहेत.