पेट्रोल टाकून जाळलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर : ४० टक्के जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 08:21 PM2020-02-03T20:21:53+5:302020-02-03T20:23:21+5:30
हिंगणघाट जळीत प्रकरणातील जखमी तरुणीवर स्थानिक रुग्णालयात उपचार केल्यानंतर नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनुसार ती ४० टक्के जळाली असून अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरचौकात एका तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेरी चौकात घडली. जखमी तरुणीवर स्थानिक रुग्णालयात उपचार केल्यानंतर नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनुसार ती ४० टक्के जळाली असून अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
अविवाहित असलेली २४ वर्षीय पीडित तरुणी एका महाविद्यालयात शिक्षिका आहे. सोमवारी सकाळी घडलेल्या घटनेनंतर हिंगणघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात तिच्यावर उपचार करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहता हिंगणघाट पोलिसांनी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नुरुल अमीन, एन्टेन्सिव्हिस्ट तज्ज्ञ डॉ. शीतल चौहान यांच्या देखरेखीखाली कॅज्युअल्टी मेडिकल आॅफिसर डॉ. दीपक कोरे, जळीत तज्ज्ञ व प्लॅस्टिक सर्जन डॉ. दर्शन रेवानवार यांनी तातडीने उपचाराला सुरुवात केली.
हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, त्या तरुणीच्या तोंडावर पेट्रोल टाकल्याने ते श्वसननलिकेपासून ते अन्ननलिकेपर्यंत गेले असावे. यामुळे शरीरावरील व आतील जखमा गंभीर आहेत. पुढील ७२ तास त्या तरुणीसाठी महत्त्वाचे आहेत. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेली ही तरुणी ४० टक्के जळाली. यात तिचा चेहरा, मान, डोक्याचा भाग, डावा हात, छाती जळालेली आहे. श्वसननलिका जळाल्याने तिला श्वास घेण्यास कठीण जात आहे. डॉ. दर्शन रेवानवार यांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, असेही ते म्हणाले.