जात पंचायतीने नाकारल्याने जळगावात युवतीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 04:14 AM2020-01-25T04:14:46+5:302020-01-25T04:16:18+5:30
जात पंचायतीत घेण्यास संबंधितांनी नकार दिल्याने हतबल झालेल्या १९ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
जळगाव : जात पंचायतीत घेण्यास संबंधितांनी नकार दिल्याने हतबल झालेल्या १९ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दुैवी घटना शुक्रवारी सकाळी शहरातील कंजरवाडा- सिंगापूर भागात उघडकीस आली. या प्रकाराची वाच्यता होऊ नये म्हणून या युवतीचा मृतदेह तब्बल १२ तास घरातच ठेवण्यात आला. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
मानसी आनंद बागडे असे मृत तरुणीचे नाव आहे. तिचे वडील आनंद बागडे हे राज्य विद्युत वितरण कंपनीत नोकरीला आहेत. त्यांनी २० वर्षांपूर्वी परजातीय मुलीशी प्रेमविवाह केला होता. त्यांना मुली झाल्या. मानसीच्या आजोबांना हा विवाह मान्य नव्हता. कालांतराने पती- पत्नी विभक्त झाले. यानंतर आजोबांनी मुलगा आनंद याचे लग्न समाजातील एका महिलेशी लावून दिले. तेव्हापासून मानसीचे वडील दुसऱ्या पत्नीसोबत राहत होते. तर मानसीची आई दोन्ही मुलींसोबत कंजरवाड्यातच विभक्त राहत होती. इकडे मानसी आता वयात आली होती.
तिचे आपल्याच समाजातील मुलाशी लग्न व्हावे म्हणून काकांनी पुढाकार घेतला होता. तिच्यासाठी कोल्हापूरचे स्थळही आले होते. मात्र, आजोबांनी तिला समाजात घेण्यास विरोध दर्शविला होता. विनवण्या करुनही त्यांनी विरोध कायम ठेवला. शेवटी हतबल होऊन तिने गुरुवारी दुपारी १२ वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
मानसीचा मृत्यू हा डोक्यात ताप गेल्यामुळे झाला. नातेवाइकांची प्रतीक्षा करीत असल्यामुळे अंत्यसंस्काराला उशीर झाला त्यामुळे मृतदेह घरातच ठेवण्यात आला होता. - आनंद बागडे, मानसीचे वडील.
वैद्यकीय अहवालानुसार, मानसी हिने गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. जात पंचायतीमुळे या युवतीने आत्महत्या केल्याबाबत तक्रार आली आहे.
- रणजीत शिरसाठ,
निरीक्षक, एमआयडीसी पोलीस स्थानक, जळगाव
आजोबा व जात पंचायतीने जातीत घेण्यास विरोध केल्याने मानसी हिने आत्महत्या केली आहे. याशिवाय पंचायतीच्या पद्धतीने अंत्यसंस्कार व्हावेत, यासाठी मानसीच्या आई-वडिलांकडून २० हजार रुपये दंड घेण्यात आला आहे. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी.
- कृष्णा इंद्रेकर,
समाज नेते, वांद्रा मुंबई