व्हॉट्सअॅप वरून लॉजमध्ये वेश्या व्यवसायासाठी पाठवल्या जात होत्या तरुणी, पोलिसांनी असा केला भांडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 06:15 PM2022-03-26T18:15:32+5:302022-03-26T18:16:00+5:30
गुन्हे शाखा १ चे पोलीस निरीक्षक रविराज कुराडे, सहायक निरीक्षक पुष्पराज सुर्वेसह अर्जुन जाधव, संदीप शिंदे, विकास राजपूत, विजय गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचला.
मीरारोड - व्हॉट्सअॅप वर तरुणींचे फोटो दाखवून त्यांना एका लॉजमध्ये वेश्या व्यवसायासाठी पाठवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाईसाठी बनावट ग्राहकासह नोटाही बनावट वापरल्या होत्या.
गुन्हे शाखा १ चे पोलीस निरीक्षक रविराज कुराडे, सहायक निरीक्षक पुष्पराज सुर्वेसह अर्जुन जाधव, संदीप शिंदे, विकास राजपूत, विजय गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचला. बोगस ग्राहकामार्फत शुक्रवारी एका व्हॉट्सअॅपवर त्यांनी वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरवणाऱ्याशी संपर्क साधला. समोरच्याने ८ तरुणींचे फोटो पाठवले असता त्यातील दोन तरुणीं बाबत सौदा नक्की करून ऑनलाईन आगाऊ रक्कम अदा केली.
यानंतर, समोरच्याने काशीमीरा येथील सूर्य प्रकाश लॉजमध्ये तरुणी पाठवत असल्याचे सांगितले. लॉजमध्ये दोन खोल्या बुक केल्यानंतर एका रिक्षातून तीन तरुणींना लॉज जवळ आणले. एक तरुणी रिक्षात थांबली तर दोघी बबलू सह लॉजमध्ये गेल्या असता बाहेर असलेल्या पोलिसांनी रिक्षा चालक कुलेश्वरकुमार ध्यान गुप्ता (४२) रा. रावल पाडा, दहिसर ह्याला ताब्यात घेतले. तर लॉजमध्ये गेलेल्या बबलूने बोगस ग्राहकाकडून पैसे घेताच त्यालासुद्धा पोलिसांनी पकडले. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून तीन पीडित तरुणीची सुटका करण्यात आली आहे.