नागरकोईल एक्स्प्रेसच्या इंजिनवर युवकाने भिरकावला दगड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 08:56 PM2019-05-22T20:56:49+5:302019-05-22T21:00:34+5:30
खंडाळा घाटातील स्टेशन ठाकुरवाडी दरम्यानची घटना; कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने केला निषेध
डोंबिवली - पुणे दिशेकडुन मुंबई दिशेला जाणा-या नागरकोईल एक्स्प्रेस ह्या गाडीच्या इंजिनवर एका तरुणाने दगड भिरकावल्याने रेल्वे इंजिनची समोरील काच फुटल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी ७.११ च्या सुमारास घडली. या घटनेमध्ये गाडीचे पायलट थोडक्यात बचावले. खंडाळा घाटातील ठाकुरवाडी येथे सिग्नलला थांबलेल्या प्रगती एक्स्प्रेस मधील आठ ते दहा युवक रेल्वे लाईन मध्ये उतरले होते, त्याचदरम्यान तेथून नागरकोईल एक्स्प्रेस ही गाडी जात असताना एका युवकाने रेल्वे रुळांमधील दगड गाडीच्या इंजिनच्या दिशेने भिरकवल्यामुळे ही घटना घडली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याची माहिती पायलटनेच दिल्याचे कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या पदाधिका-यांनी सांगितले.
त्या अपघातात पायलट जखमी झाले असते तर फार मोठा अनर्थ घडला असता. समोरुन दगड मारणारा युवक हा पेहरावाने सुशिक्षित वाटत होता, त्याने निळा व सफेद रंगाचे पट्टे असलेला चौकटीचा शर्ट घातला होता तसेच सगळया युवकांच्या पाठीवर प्रवाशी सॅकही होती, असे वर्णन नागरकोईलच्या पायलटने केले असल्याची माहिती संस्थेचे सचिव प्रभाकर करंजकर यांनी दिली. राष्ट्रीय संपत्तीचे, मालमत्तेचे नुकसान वा त्यास हानी पोहचवणा-या वृत्तीचा कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन जाहिर निषेध करत असल्याचे ते म्हणाले. ही घटना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शींनी असे कृत्य करणा-या युवकांना ओळखत असल्यास संबंधितांची माहिती रेल्वे प्रशासनाला द्यावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अशाप्रकारे समाजातील विकृत बाबींना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे असल्याचे मत करंजकर यांनी व्यक्त केले.या घटनेसंदर्भात कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आल्याचेही ते म्हणाले.