मौजमस्तीसाठी आलेल्या तरुणांनी केला वृद्धेचा खून, पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या
By पंकज शेट्ये | Published: May 17, 2024 11:55 PM2024-05-17T23:55:19+5:302024-05-17T23:55:41+5:30
गायत्री मराठे खून प्रकरणातील आरोपी विजय आणि रवींद्र हे चुलत भाऊ आणि चांगले मित्र आहेत.
वास्को : २६ दिवसापूर्वी पिशे डोंगरी - खारीवाडा येथील ७९ वर्षीय गायत्री मराठे यांचा खून केलेल्या दोन्ही आरोपींना आंध्र प्रदेश येथून गजाआड करण्यास पोलिसांना यश आले. गोव्यात मौजमस्तीच्या उद्देशाने पहिल्यांदाच आलेल्या ३५ वर्षीय विजय लक्षिमण्णा गोरली आणि २५ वर्षीय गोरेल्ला रवींद्रा यांनी चोरीच्या उद्देशाने गायत्री यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी त्यांना पाहून गायत्री यांनी आरडा-ओरडा केल्यामुळे तिचा खून केल्याचे चौकशीत उघड झाले.
क्राईम ब्रांच पोलिसांनी विजय याला आंध्र प्रदेशात गजाआड करून गोव्यात आणल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याची सात दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. दुसरा आरोपी गोरेल्ला रवींद्रा याला वास्को पोलीसांनी आंध्र प्रदेशात पकडल्यानंतर त्याला गोव्यात घेऊन येत असून शनिवारी (दि.१८) पहाटेपर्यंत ते वास्को पोलीस स्थानकावर पोचणार आहेत.
गायत्री मराठे खून प्रकरणातील आरोपी विजय आणि रवींद्र हे चुलत भाऊ आणि चांगले मित्र आहेत. १९ एप्रिलच्या रात्री ते गोव्यात फिरण्यासाठी आणि मौजमस्तीसाठी आले. ते दोघेही पहिल्यांदाच गोव्यात आले होते अशी माहिती पोलीसांना चौकशीत मिळाली आहे. १९ च्या रात्री गोव्यात आल्यानंतर ते वास्को रेल्वे स्थानकाच्या बाहेरील परिसरात झोपले. २० एप्रिलला ते पिशे डोंगरी परिसरात फिरताना त्यांना गायत्री या दिसून आस्या. त्यांनी तिच्याबाबत माहिती काढली असता तिच्या पतीचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला असून तिला मुले नसल्याने ती घरात एकटीच राहत असल्याचे त्यांना समजले. यानंतर तिच्या अंगावर सोन्याचे दागिने पाहून दोघांनीही तिच्या घरात घुसून चोरीचा बेत रचला अशी माहिती चौकशीत उघड झाल्याचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले.
दोघांनीही गायत्री यांच्या घराच्या बाजूलाच असलेल्या ‘बार’ मध्ये बसून दारू पित तिच्यावर पाळत ठेवण्यास सुरवात केली. २१ एप्रिलला दोघांना ती संधी मिळाल्यानंतर त्यांनी जबरदस्तीने तिच्या घरात प्रवेश केला. दोघांनीही गायत्रीच्या घरात चोरीसाठी प्रवेश केल्याचे तिने पाहताच आरडा ओरडा मारायला सुरवात केली. यानंतर दोघांनीही तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र गायत्री या आरडा ओरडा मारण्याचे बंद करत नसल्याने त्यांच्या गळ्यावर कटरने हल्ला करून खून केला. गायत्री यांच्या अंगावर सोन्याचे दागिने होते, मात्र खून केल्यानंतर भितीने आरोपींनी ते दागिने न काढता तेथून पळ काढल्याचे चौकशीत समजल्याची माहिती राहुल गुप्ता यांनी दिली.