"तुझ्या कष्टामुळे चांगले फळ मिळाले..."; एक कोटीची लाच घेणाऱ्या दोघांचे संभाषण उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 09:55 AM2023-11-06T09:55:43+5:302023-11-06T09:56:51+5:30

या लाचखोरीत फरार असलेला तत्कालीन उपअभियंता गणेश वाघ याचाही सहभाग निष्पन्न झाला आहे. 

"Your labor has borne good fruit..."; The conversation of two people who took a bribe of one crore revealed | "तुझ्या कष्टामुळे चांगले फळ मिळाले..."; एक कोटीची लाच घेणाऱ्या दोघांचे संभाषण उघड

"तुझ्या कष्टामुळे चांगले फळ मिळाले..."; एक कोटीची लाच घेणाऱ्या दोघांचे संभाषण उघड

नाशिक : एका शासकीय ठेकेदाराकडून त्याने केलेल्या कामाच्या मोबदल्यात देयकांची रक्कम मंजूर करून देण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागणारा व घेणारा सहायक अभियंता अमित किशोर गायकवाड व तत्कालीन उपअभियंता गणेश वाघ यांच्यामधील मोबाइलवरील संभाषण अत्यंत धक्कादायक असून, वाघ याने गायकवाड याच्यासोबत बोलताना ‘तुझ्या कष्टामुळे हे चांगले फळ मिळाले...’ असे शेवटी वाक्य वापरल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासातून समोर आली आहे.

एक कोटी रुपयांची लाच घेताना अहमदनगर येथील राज्य औद्योगिक विकास महामंडळाचा सहायक अभियंता अमित गायकवाड (३२, रा. आनंदविहार, नागापूर, जि. अहमदनगर) याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले. या लाचखोरीत फरार असलेला तत्कालीन उपअभियंता गणेश वाघ याचाही सहभाग निष्पन्न झाला आहे. 

पडताळणी करून पकडले रंगेहाथ 
तक्रारीवरून नाशिक परिक्षेत्राच्या पथकाने २० ऑक्टोबरला पडताळणी केली. यावेळी अमित गायकवाडने तक्रारदाराकडून स्वत:साठी व संशयित गणेश वाघ याच्यासाठी एक कोटी रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केले होते. 
वाघ आणि गायकवाड यांच्या संभाषणात तर चक्क ‘तुझ्या कष्टाचे हे फळ मिळाले आहे’, असेही वाक्य समोर आले आहे, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी नाशिकमध्ये सांगितले. 
धुळे येथे कार्यकारी अभियंता असलेला वाघ आणि गायकवाड या दोघांविरुद्ध अहमदनगरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुदत संपली, तरी मागील बिले काढण्याचा प्रकार
मुळा धरण ते एमआयडीसी या जलवाहिनीचे जुने पाइप बदलण्याचे हे काम तीन वर्षांपासून सुरू होते. या कामाची मुदत संपली होती. विळद घाट येथील काम शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अडविलेले आहे. हे काम अपूर्ण असताना ठेकेदाराला मागच्या तारखेने बिल मंजूर करण्यासाठी व काम अपूर्ण असताना त्याची अनामत रक्कम परत देण्यासाठी गायकवाड याने ठेकेदाराकडे १ कोटी मागितले होते. 

चांगले पुरावे हाती! 
नाशिकच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध अशी सापळा कारवाई केली आहे. अहमदनगरच्या या कारवाईत चांगले पुरावे हाती लागले आहेत. यामुळे ही केस उत्तमरीत्या उभी राहण्यास मदत होईल. फरार संशयितदेखील लवकरच हाती लागेल. या दोघांची अहमदनगर व पुण्यातील घरेदेखील पथकांकडून ‘सील’ करण्यात आली आहेत. या प्रकरणी वेगवान तपास केला जाईल, असे विश्वास नांगरे-पाटील म्हणाले. 

लाचेच्या रकमेत वाटेकरी किती?
गायकवाड हा सहायक अभियंता आहे. त्याच्यावर कार्यकारी अभियंता व मुख्य अभियंता अशी पदरचना आहे. 
कार्यकारी अभियंता व मुख्य अभियंता हे दोघेही पुणे कार्यालयात असतात, तर नगर कार्यालयातील 
तत्कालीन उपअभियंता वाघ हा धुळे येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहे. 
गायकवाड याने स्विकारलेल्या १ कोटीतील निम्मी रक्कम वाघ याला देण्यात येणार होती, तसेच जुने बिल मागील तारखेने दिले जाणार असल्याने, लाचेच्या रकमेत आणखी इतर किती वाटेकरी होते, याचा शोध पोलिस घेत आहेत.

Web Title: "Your labor has borne good fruit..."; The conversation of two people who took a bribe of one crore revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.