उदयनराजेंच्या निवासस्थानातून चांदीची बंदुक चोरणाऱ्या युवकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 11:14 AM2020-11-10T11:14:04+5:302020-11-10T11:15:12+5:30
Crime News : दीपक पोपट सुतार (वय २६, रा. माची पेठ सातारा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानातून शोभेची चांदीची दोन किलोची बंदूक चोरून नेणाऱ्या युवकास शाहुपुरी पोलिसांनी अटक केली असून आणखी काही शोभेच्या वस्तू त्याने चोरल्या असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
दीपक पोपट सुतार (वय २६, रा. माची पेठ सातारा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहुपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी सोमवारी दुपारी राजवाडा परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी दीपक सुतारकडे चांदीची बंदुक असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडे ही बंदूक कुठून आणली, अशी चौकशी केल्यानंतर त्याने सुरुवातीला माझ्या एका मित्राने दिली असल्याचे सांगितले, मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने ही दोन किलोची चांदीची शोभेची बंदूक खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानातून चोरली असल्याची कबुली दिली. त्यानंतर मात्र पोलिसांनी आणखी तपासाची चक्रे फिरवून त्याच्यासोबत आणखी कोणी होते का याचा शोध घेतला तसेच इतर चांदीच्या वस्तूही त्याने चोरल्या असण्याची शक्यता धरून पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत.
दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून मात्र यापूर्वी पोलीस ठाण्यात ही बंदुक चोरीस गेली असल्याची तक्रार दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.