बसमध्ये तरुणाचा हल्ला, कंडक्टर थाेडक्यात वाचला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 03:15 PM2024-01-01T15:15:51+5:302024-01-01T15:16:09+5:30
याप्रकरणी मालाड पोलिसांनी सिंग याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : बसमधून उतरण्यासाठी २० वर्षीय तरुण चालकासोबत वाद घालत शिवीगाळ करत होता. त्यावेळी समजूत काढण्यासाठी पुढे आलेल्या कंडक्टरला तरुणाने जबर मारहण करून रक्तबंबाळ केले. निखिल अमन सिंग (२०) असे हल्लेखोराचे नाव आहे, तर शशिकांत डगळे (३९) असे जखमी कंडक्टरचे नाव आहे. या हल्ल्यात डगळे सुदैवाने बचावले. याप्रकरणी मालाड पोलिसांनी सिंग याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
शशिकांत डगळे हे बेस्टमध्ये कंडक्टरपदी कार्यरत आहे. ३० डिसेंबर रोजी रूट क्रमांक ७२० वर मालवणी ते भाईंदर असा कामाचा रूट संपवून ते दुपारी कुरारला घराच्या दिशेने निघाले. मालवणीवरून मालाड रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी बस (क्रमांक २७३) मध्ये चढले़ बस दुपारी ४.३० च्या सुमारास मार्वे रोड जंक्शन सिग्नल, एस़ व्ही़ रोड परिसरात आली.
तरुणाने कामावर जायला उशीर होत असल्याचे सांगत बस चालकासोबत वाद घातला. त्यावर पुढचा स्टॉप काही अंतरावर आहे़ त्यामुळे मी मध्येच गाडी थांबवू शकत नाही. कारण मागून अन्य गाड्या वेगाने येत असून, अपघात घडू शकतो, असे चालक आणि मी त्याला समजावले. मात्र तरीही त्याने माझ्यावर हल्ला केला.
- शशिकांत डगळे, जखमी, बेस्ट कंडक्टर
सिंग हा बस चालक रशीद शेख यांच्यासोबत बस थांबवा, मला बसमधून उतरू द्या, असे म्हणून वाद घालू लागला. त्यावेळी डगळे यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता सिंगने शिवीगाळ करत हातातील कड्याने डगळेच्या डोक्यात हल्ला केला. त्या ते गंभीर जखमी झाले़ त्यांनी जखमी अवस्थेत शताब्दी रुग्णालयात धाव घेतली.