नातेवाईकांच्या त्रासातून तरुणाची आत्महत्या; पोलीस ठाण्यात ८ दिवसानंतर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 04:52 PM2022-01-08T16:52:31+5:302022-01-08T16:53:16+5:30
Crime News : सामाजिक संघटना यांनीही संबंधित आरोपीला अटक करण्याची मागणी केली.
सदानंद नाईक
उल्हासनगर - नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून विशाल भालेराव या तरुणांने गेल्या आठवड्यात आत्महत्या केल्याचा आरोप आई-वडिलांनी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आजी सावित्री गायकवाड व मामी अंजना गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर पूर्वेत राहणारा विशाल भालेराव याला पैशाची गरज असल्याने, त्याने आजी सावित्री श्रीराम गायकवाड व मामी अंजना संतोष गायकवाड यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यांच्याकडे पैसे नसल्याने, त्यांचे सोने गहाण ठेवून विशाल याने पैसे घेतले होते. दरम्यान आजी व मामी यांनी पैशाचा तगादा लावल्याच्या त्रासातून गेल्या आठवड्यात विशालने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
आजी सावित्री गायकवाड व मामी अंजना गायकवाड यांच्यासह इतरांच्या त्रासातून आत्महत्या केल्याचा आरोप विशालच्या आई-वडिलांनी केला. तसेच सामाजिक संघटना यांनीही संबंधित आरोपीला अटक करण्याची मागणी केली. अखेर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड हे स्वतः फिर्यादी होऊन आजी सावित्री गायकवाड व मामी अंजना गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला. अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस करीत आहेत.